त्या झिरो तलाठ्याने लावले जमिनीला स्वतःचे नाव

मुख्य बातम्या

तत्कालीन तलाठ्यासह झिरो तलाठ्यावर शिक्रापूर पोलिसांत गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथील तलाठी यांच्या कार्यालयात कामाला असेलल्या खाजगी व्यक्तीने भावकीतील व्यक्तीच्या जमिनीवर वारस नोंद करताना खाडाखोड करुन स्वतःचे नाव लावून घेत फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रामदास बाबुराव भालेकर या झिरो तलाठ्यासह पारोडीच्या तत्कालीन गावकामगार तलाठ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पारोडी (ता. शिरुर) येथील मोहन भालेकर यांच्या वडिलांचे १९९७ साली निधन झाले. त्यामुळे मोहन भालेकर यांनी वडिलांच्या १९९७ साली झालेल्या निधनानंतर त्यांच्या नावाची वारस नोंद होण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र सदर तलाठी कार्यालयात त्यांच्या भावकीतील रामदास भालेकर या इसम कामाला असल्याने त्याने सदर वारस नोंद करत असताना शासकीय कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत स्वतःचे रामदास बाबुराव भालेकर हे देखील नाव वारस नोंद मध्ये लिहून तत्कालीन तलाठी यांना हाताशी धरून नावाची नोंदणी करुन घेतली.

काही दिवसांनी त्याने सदर जमिनीपैकी काही जमिनीवर ताबा देखील मिळवला मात्र मोहन भालेकर यांनी तलाठी कार्यालय सह तहसील कार्यालय येथून सर्व कागदपत्रे काढून घेत चौकशी केली असता घडलेला सर्व प्रकार लक्षात आला तसेच तलाठी कार्यालयात कामाला असलेल्या रामदास भालेकर याने केलेला पराक्रम समोर आले.

याबाबत मोहन केरभाऊ भालेकर (वय ५2) रा. पारोडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी रामदास बाबुराव भालेकर रा. पारोडी (ता. शिरुर) जि. पुणे व तत्कालीन गावकामगार तलाठी दहिवडी – पारोडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करत आहे.