पठ्यान आईला शब्द दिला…तुझ्यासाठी आता जिल्हा पातळीवरच पद आणणार अन शब्दच खरा केला…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) सन २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या आईचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला. हा पराभव त्याच्यासहीत सगळ्यांनाच्याच मनाला चटका लाऊन गेला. पण भावानं आईला शब्द दिला. ‘आता गाव पातळीवर नाही लढायच…तुझ्यासाठी जिल्हा पातळीवरच पद आणणार’… अन पठ्यान दिलेला शब्दच खरा केला. सन २०२३ च्या राज्यसेवा परीक्षेत त्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) पदी निवड झाली. आता तो जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत आणि पंचायत समित्या यांचा अधिकारी झाला.

 

एखाद्या चित्रपटाचं कथानक शोभाव असा हा प्रसंग घडलाय. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल नामदेव वाळुंज याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले असुन जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेचा निकाल २६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर झाला होता. स्वप्निल वाळुंज याने या परीक्षेत राज्यात ६८ वा क्रमांक मिळवत कुटुंबीय व गावचे नाव उज्वल केले आहे.

 

‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या संतवचनाप्रमाणे स्वप्निल वाळुंजच्या रुपाने शिंदोडी गावचे नाव प्रथमच महाराष्ट्र राज्यात झळकले. शेतकरी कुटुंबातील स्वप्निल याची आई गृहिणी तर वडील शेतकरी आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या स्वप्निलने सन २०१९ पासुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी चालु केली होती.

 

परंतु कोरोना महामारीमुळे सन २०२० आणि सन २०२१ या दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे २०२२ मध्ये झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत स्वप्निलने सहायक आयुक्त, (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) तसेच मंत्रालय कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक या तीन परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यानंतर सन २०२३ च्या राज्यसेवा परीक्षेत त्याची नुकतीच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) पदी निवड झाली.

 

पठ्यानं आईला शब्द दिला अन तो खरा पण केला…

सन २०२१ मध्ये शिंदोडी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वप्निलच्या आई उज्ज्वला नामदेव वाळुंज यांनी सदस्यपदाची निवडणुक लढवली. परंतु दुर्दैवाने त्यांचा २ मताने पराभव झाला. यावेळी स्वप्निल सह सर्व वाळुंज कुटुंबाच्या मनाला हा पराभव चटका लाऊन गेला. पण त्याच वेळी स्वप्निलने आईला शब्द दिला. ‘आई काळजी करु नकोस…तुझ्यासाठी जिल्हा पातळीवरच पद आणणार’… अन पठ्यान आईला दिलेला शब्दच खरा करुन दाखवला. सन २०२३ च्या राज्यसेवा परीक्षेत नुकतीच त्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) पदी निवड झाली आहे. स्वप्निलच्या यशाचं शिंदोडी ग्रामस्थांसह सर्व स्तरातुन त्याच कौतुक होत आहे.

शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल वाळुंजचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश