डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराबाबत भिम आर्मीचे बेमुदत धरणे आंदोलन

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या असलेल्या डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाने मनमानी कारभार करत कोणतीही पुर्वसुचना न देता तसेच कामगारांना अपमानास्पद वागणूक देवून, मारहाण, शिवीगाळ, नुकसानभरपाई न देता, खोटे आरोप करुन कायमस्वरुपी कंपनीत पर्मनंट असणाऱ्या काही ठराविक कामगारांना कामावरुन काढुन टाकले आहे. त्यामुळे जोपर्यंत या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत कामगारांच्या वतीने भिम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय सिंग तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या अध्यक्षतेखाली भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्या माध्यमातून मंगळवार (दि 15) रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिरुर-पारनेर-श्रीगोंदाचे प्रभारी संदिप शेलार आणि शिरुर तालुकाध्यक्षा दिपीका भालेराव यांनी सांगितले.

रांजणगाव गणपती MIDC तील व्हील्स इंडिया कंपनीपासुन सकाळी 9 वाजता या आंदोलनाची सुरवात होणार असुन अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कामगार डॉंगकाॅंग कंपनीचे कामगार त्यांच्या कुटुंबीयांसोबत या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यानंतर कंपनीच्या गेटवर मुजोर प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार असुन यावेळी कंपनीने कामावरुन काढुन टाकलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणे, कामगारांची झालेली नुकसानभरपाई देणे, कंपनी व्यवस्थापकांवर योग्य ती कारवाई करणे अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, पुणे जिल्हा महासचिव अविनाश उबाळे, महिला नेत्या मंजुषा महेश कुलकर्णी, शिरुर तालुका अध्यक्ष दिपिका भालेराव, उपाध्यक्ष शहाजी पवार, महिला उपाध्यक्ष कविता भवार, युवा कार्यकर्ते महेश कुलकर्णी, संजय गव्हाणे, गणेश राठे व अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनास भूमिपुत्र सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ (बंटी) नवले तसेच आर पी गटाचे मनोज जगताप, विनोद जगताप यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.