कोरेगाव भीमा सह परिसरात पोलीस बंदोबस्त सुरु

मुख्य बातम्या

शिक्रापूर परिसराला आले पुन्हा छावणीचे स्वरूप

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 4 वर्षापूर्वी झालेल्या दंगली नंतर प्रत्येक वर्षी 1 जानेवारीच्या मानवंदना कार्यक्रमासाठी 2 दिवस आधी पासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत होता. परंतु आता 4 दिवस आधी पासूनच शिक्रापूर सह परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोरेगाव भीमा सह शिक्रापूर परिसराला पुन्हा छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक व दोन जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारामुळे त्यावेळी त्या ठिकाणी तब्बल महिनाभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता, तर त्यानंतर प्रत्येक वर्षी 1 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पोलीस व प्रशासनाने मोठी जय्यत तयारी व नियोजन करुन 1 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम शांततेत पार पाडत आदर्श निर्माण केला आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे सदर कार्यक्रमात काही प्रमाणात बंधने होती, तर गतवर्षी मोठ्या प्रमाणात समाज बांधव येथे मानवंदना देण्यासाठी येणार असल्याचे बोलले जात असताना प्रशासनाने पुन्हा तयारी करत उत्तम प्रकारे नियोजन सुरु केले असून यापूर्वी च्या कार्यक्रम दरम्यान राहिलेल्या काही त्रुटी दुरुस्त करुन घेत कार्यक्रमाची पूर्वतयारी व नियोजन केले आहे, तर मागील वर्षी पेक्षा चालू वर्षी बसेस तसेच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

यावेळी तब्बल 10 हजार हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी तर काही पोलीस मित्र व काही संघटनांचे जवान बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत, तर शिक्रापूर, सनसवाडी, कोरेगाव भीमात एक जानेवारीच्या चार दिवस आधी पासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात येत असून लवकरच पोलीस बंदोबस्त परिसरात दाखल झाल्यामुळे शिक्रापूर, कोरेगाव भीमा सह सणसवाडी, वढू बुद्रुक, यांसह आदी गावांना छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.