shirur nagar parishad

पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला कारवाई करण्याबाबत काढला आदेश

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी वेळोवेळी शिरुर शहरात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला असुन शिरुर नगरपालिकेला “टाळे” ठोकण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनापासुन सदर व्यक्तींना परावृत्त करावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा असा आदेश, पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरूर नगरपरिषदेला दिला आहे.

 

शिरुर शहरातील नागरिकांना धोका व नुकसान होणाऱ्या गोष्टींविरुद्ध कायमच महिबुब सय्यद, अनिल बांडे, अविनाश घोगरे, रवी लेंडे यांनी आवाज उठवला आहे. तसेच त्यासाठी वेळोवेळी ते प्रशासनाला चुकीच्या गोष्टी लक्षात आणुन देत आंदोलनही करत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरुर शहरातील शिरुर परिवहन मंडळ यांनी शिरुर नगरपालिकेच्या मालकीची जमीन बळकवण्याचा केलेला प्रयत्न, शिरुर शहरातील अनधिकृत बांधकामे व पार्किंग सुविधा उपलब्ध नसणाऱ्या इमारती, तसेच रोडच्या शेजारील बेशिस्त वाहने पार्किंग व रोडवर असणाऱ्या खड्ड्यांबाबत निवेदन देत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन व वेळ प्रसंगी उपोषणही केले होते.

 

या धोक्याच्या घंटा नगरपालिका मुख्याधिकारी यांना दाखऊनही योग्य ती कारवाई होत नसल्याने व पदपथावरील jio कंपनीचे अनधिकृत खांब, चतुर्थ वार्षिक श्रेणीकर आकारणी मधील त्रुटी व शिरुर नगर प्रशासन यांचा अनागोंदी कारभाराबाबत दि. 4 सप्टेबर रोजी शिरूर नगर पालिकेला “टाळे ठोक” आंदोलनाबाबत जिल्हाधिकारी पुणे यांना दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी पत्र दिले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने नगरपरिषद स्तरावर चौकशी करून नियमांनुसार योग्य कार्यवाही करावी व संबंधिताना अवगत करावे तसेच त्यांना “टाळे ठोक” आंदोलन करण्यापासुन परावृत्त करावे. तसेच केलेल्या या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असा आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी शिरुर नगरपरिषदेला दिला आहे. आता शिरुर नगरपरीषद यावर काय कारवाई करते. याकडे शिरुर शहरवासियांचे लक्ष लागले आहे.