शिरुर तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्याला वाचवण्यासाठी माजी उपसरपंचांची बाजी

राजकीय

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झालेला असताना सणसवाडी येथे चक्क ढगफुटी सदृश पाऊस झाला. यावेळी चक्क नागरिकांच्या घरात्ब पाणी घुसून शालेय मुलांच्या पुस्तकांसह साहित्यांचे तसेच खते विक्रेत्या दुकानदाराच्या गोडाऊन मध्ये पाणी गेल्याने खतांचे नुकसान झाले. मात्र यावेळी ओढ्याला पूर आल्याने पाण्यात वाहून जाणाऱ्या इसमाला वाचवण्यासाठी माजी उपसरपंच सागर दरेकर यांनी जीवाची बाजी लावत नागरिकाचे प्राण वाचवले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे अचानक चक्क ढगफुटी सदृश पाऊस झाला यावेळी ओढ्याला अचानक मोठा पूर आला येथून काही नागरिक जात असताना पाण्यातून सायकल घेऊन चाललेल्या एका व्यक्तीचा तोल जाऊन सदर इसम पाण्यातून वाहून जाऊ लागला काही नागरिकांनी आरडाओरडा केल्याने माजी उपसरपंच सागर दरेकर यांनी तातडीने पाण्यात उडी घेत सडत व्यक्तीला पकडून काही नागरिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढले.

तब्बल दीड तास चाललेल्या या मुसळधार पावसामुळे गावातील मोहन दरेकर यांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांच्या घरातील गृहपयोगी वस्तूंसह त्यांच्या शालेय मुलांच्या पुस्तके पाण्यात बुडाली, तर शेजारी असलेल्या रमेश जेधे यांच्या रोहित अॅग्रो एजन्सी दुकानाच्या गोडावून मधील शेतीच्या खतांच्या तब्बल 40 गोण्या देखील पाण्यात बुडाल्या असल्याची घटना घडली.

आज सकाळच्या सुमारास पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, सणसवाडीचे माजी उपसरपंच सागर दरेकर, अॅड. विजयराज दरेकर, बबन दरेकर यांसह आदींनी घरात पाणी शिरलेल्या व्यक्तीच्या घरी भेट देत पाहणी केली, तर उपस्थितांसह ग्रामस्थांनी पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवणाऱ्या सागर दरेकर यांचे विशेष आभार मानले.

ओढ्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे: पंडित दरेकर

सणसवाडी येथील ओढ्याला पूर येत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली याबाबत बोलताना अनेक ठिकाणी ओढ्यावर अतिक्रमण झाले असल्याने पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत बदलत आहे. त्यामुळे पाणी वाहण्यास अडथळे निर्माण होत असल्याने अशा घटना घडत असून या घटना टाळण्यासाठी ओढ्यांवरील अतिक्रमण हटवणे गरजेचे असल्याचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांनी सांगितले.