शिरुर तालुक्यात वाघीण बछड्यांसह फिरत असल्याची अफवा

मुख्य बातम्या

शिंदोडी (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील गव्हाणेवस्ती शेतात एक वाघीण आपल्या ३ बछड्यांसह फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित होत असून तो व्हिडीओ आपल्या भागातील नसून नागरिकांनी अफवा न पसरविता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिरुर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी केले आहे.

शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील मोटेवाडी, निमोणे, शिंदोडी, गुनाट, चिंचणी या गावांमध्ये नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असुन निमोणे गावात सध्या सोशल मिडीयावर वाघीण आपल्या बछड्यांसह फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु शिरुर तालुक्यामध्ये बिबट्या आहेत मात्र वाघ नाहीत, असे असताना देखील विदर्भातील एका वाघिणीचा आपल्या तीन बछड्यांसह फिरतानाचा व्हिडीओ सध्या शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या गावांमधील युवक व नागरिकांच्या सोशल मिडीयावर प्रसारित होत असुन शिरुर तालुक्यात वाघीण आणि तिचे बछडे असल्याची अफवा पसरवली जात असल्याने शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

सध्या उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे बिबट्यांची लपण्याची जागा कमी झाल्याने बिबटे नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. तर सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ बाबत बोलताना दोन वर्षापूर्वी देखील काही गावांमध्ये नागरिकांनी हाच व्हिडिओ प्रसारित करत अफवा पसरवली होती. त्यावेळी वनविभागाने अफवा पसरविणाऱ्या लोकांना ताब्यात घेत समज दिली होती, असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यात बिबट आहेत परंतु बिबट आणि वाघ यांमध्ये साम्य असून आपल्या परिसरात वाघ नाहीत त्यामुळे नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे शिरुर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.