सर्पमित्र ते इंडिया बुक रेकोर्ड नोंदसह संस्था संस्थापक

मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील शेरखान शेखने उभारली निसर्ग वन्यजीव संस्था

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिक्रापूर सारख्या गावातून सर्पमित्र सारखे हृदयस्पर्शी व धाडसी काम करुन आपली ओळख निर्माण करत स्वतःचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवत पशु पक्षांच्या रक्षणासाठी स्वतः नव्याने संस्था स्थापन करत जिद्द असल्यास काहीही अशक्य नाही हे शिरुर तालुक्यातील एका सर्पमित्राने दाखवून दिले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेरखान शेख हा युवक दहा वर्षांपूर्वी एका सर्पमित्राच्या सानिध्यात आल्याने त्यांना देखील सापांबाबत आपुलकी वाटू लागल्याने त्यांनी सुद्धा साप पकडण्यास सुरुवात केली. मात्र त्यावेळी काही सर्पमित्र त्यांच्या कामाला विरोध करु लागले. मात्र आपण हे काम करायचेच हि जिद्द शेरखान शेख यांनी ठेवली.

परंतु आपल्याला काम करण्यासाठी वनविभाग अथवा एखाद्या सामाजिक संस्थेत सहभागी होणे गरजेचे असल्याने त्यांनी काही संस्थेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला असता जवळील सर्पमित्रांनी त्यांना त्या पासून वंचित ठेवले. परंतु त्यांनी सांगवी पुणे येथील एका संस्थेचे सभासदत्व मिळवून आपले काम सुरु ठेवले. परंतु काही सर्पमित्रांच्या माध्यमातून सदर संस्थेतून देखील त्यांना लांब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपले काम जिद्दीने सुरु ठेवून आपल्या प्रामाणिक आणि आदर्श कामातून त्यांनी अनेक पुरस्कार सुद्धा मिळवले, शिरुर वनविभागाच्या असलेल्या वन्य जीव बचाव समितीत त्यांचे नाव आले.

काही दिवसांपूर्वी साप पकडण्यासाठी चक्क चांदीची स्टिक बनवून त्यांनी राज्यात विक्रम नोंदवला दरम्यान शेरखान शेख यांच्या कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आणि सर्पमित्र शेरखान शेख हे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाले. मात्र ते काम करत असलेल्या संस्थेतून काही कारणामुळे बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेत आपल्याला नवीन संस्थेत सामील व्हायचे असे काही मित्रांना सांगितले.

मात्र भोसरी येथील एका खास मित्रांने त्यास विरोध दर्शवत आम्ही तुझ्या सोबत आहे आता आपणच नवीन संस्था स्थापन करु अशी विनंती केली असता शेरखान शेख यांनी पुढाकार घेत शासकीय बाबींची पूर्तता करत नव्याने नोंदणी कृत निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्था स्थापन करत भारतातील प्रसिद्ध सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या हस्ते संस्थेचे अनावरण केले. मात्र सुरुवातीला अनेक दिवस एखाद्या संस्थेत सामील न होता आलेल्या युवकाने जिद्द असल्यास आपण काहीही करु शकतो हे दाखवून दिले आहे.

आपल्या स्वतःच्या कार्याबाबत बोलताना माझ्या वडिलांची मला व्यवसायात साथ असल्याने मी बाहेर माझे वन्य जीवांसह सर्प रक्षणाचे काम करु शकतो. तसेच संस्था उभारण्या मध्ये माझ्या मित्रांनी मला साथ दिली असल्याने याचे सर्व क्षेय माझ्या कुटुंब व मित्रांना असल्याचे शेरखान शेख यांनी सांगितले.