शिरूर तालुक्यातील सरपंचांनी चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडले गाऱ्हाणे….

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समिती येथे पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुक्यातील सरपंचांची संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या संवाद सभेला प्रंचड प्रतिसाद मिळाला आहे. सरपंच हे गावचे आई – वडील असून ते मनापासून गावातील चांगली विकासकामे करत आहे. राजकीय सुडापोटी निधी मिळत नसल्याचे गाऱ्हाणे वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांनी आपल्या संवाद सभेतून व्यक्त केले आहे

आपल्या गावात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी, घर तिथे वीज, टॉयलेट हे असणे गरजेचे असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगून पक्ष, राजकारण फक्त निवडणुकीपुरते असून निवडणुका झाल्या की सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा, असा सल्ला पाटील यांनी शिरूर तालुक्यातील सरपंचांना दिला आहे.

शिरूर पंचायत समिती सभागृह येथे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने तालुक्यातील सरपंच संवाद सभा या नावीन्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यापुढील काळामध्ये सरपंच यांनी गावाच्या विकासाकडे लक्ष देऊन खासदार, आमदार, पालकमंत्री, शासनाच्या विविध योजनातून निधी आणून गावाचा विकास करावा.

शिरूर तालुक्यातील कुठल्याही गावांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी असणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या प्रोजेक्टसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. गावातील महिला ,मुली यांसाठी स्वतंत्र टॉयलेट व चांगल्या आरोग्य सुविधा, शाळेसाठी तारेचे कंपाउंड देण्यासाठी निधी लागेल तेवढा देण्यात येणार असून कुठेही निधीची कमतरता पडणार नाही. त्यासाठी गावातील कार्यकर्त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. निधी व अडचणींसाठी माझ्याकडे निवेदना द्या त्यासाठी तुमचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, गाव रस्त्याचे प्रश्न सोडवले जातील.

आपल्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून सीएसआर फंड मिळवण्यासाठी प्रयत्न करा जिथे कुठे अडचणी तिथे पालकमंत्री म्हणून कंपनीची मी स्वतः बोलेन व निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासनही दिले. प्रत्येक सरपंचांनी या पुढील काळामध्ये आपल्या गावाची समस्या व प्रलंबित प्रश्न यासाठी माझ्या व्हाट्सअप वर निवेदन पाठवले तरी त्याचा पाठपुरावा करून तुमचे प्रश्न सोडवण्यात येईल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार म्हणाले की, शिरूर तालुक्यात अनेक समाजातील लोकांना स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावत आहे .हा प्रश्न मार्गी लावावा व शिरूर तालुक्यात दहा हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या टाकळी हाजी, कवठे येमाई ,तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी, व इतर गावांना नगरपरिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. तर शालेय विद्यार्थ्यांना चांगला व सकस पोषण आहार मिळवण्यासाठी सेंट्रल लाईज किचन योजना सुरू करावी मागणी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली.

यावेळी शिरूर चे आमदार अशोक पवार, उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे,शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी अजित देसाई, पंचायत समितीचे कर्मचारी, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जयश्री पलांडे, हिवरेचे सरपंच शारदा गायकवाड, वडगाव रासाई सरपंच सचिन शेलार, मांडवगण फराटयाचे सरपंच समीक्षा फराटे, संभाजी बेनके, सविंदण्याच्या सरपंच शुभांगी पडवळ, आण्णापूरचे किरण झंझाड, करंदीच्या सरपंच सोनाली ढोकले, डिग्रजवाडीचे सरपंच यशवंत गव्हाणे, शोभा तरटे, सुप्रिया पावसे, धनश्री मोरे, महिला व पुरुष सरपंचांनी यांनी आपल्या समस्या व केलेल्या कामांबाबत माहिती दिली.

या निमित्ताने गटविकास आधिकारी यांनी पंचायत समितीच्या केलेल्या सुशोभिकरणाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी आमदार अशोक पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना गटविकास आधिकाऱ्याने सुशोभिकरणासाठी वडाची झाडे कापल्याने नगर परिषदेने त्यांना ५ हजाराची शाबासकी मिळाल्याचे सांगितले.आमदार अशोक पवार यांच्याकडून गटविकास आधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याने वृक्षप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. इलेक्ट्रानिक मिडीयाच्या पत्रकारांना चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांना कुठलीही प्रतिक्रीया देणार नसल्याचे सांगितले.पत्रकार संवाद सभेला ऊपस्थित राहील्याने त्यांना कोणी आत सोडले.आले आहे तर बसु दया. अशी टिप्पणी केल्याने शिरूरमधील पत्रकारांमध्ये नाराजीचा सुर ऊमटला आहे.