गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिरुर पोलिस स्टेशनने चोरी गेलेले नागरिकांचे 20 मोबाईल केले परत

मुख्य बातम्या शिरूर तालुका

महाराष्ट्रसह परराज्यातून चोरी गेलेले 3 लाख 28 हजार रुपयांचे मोबाईल शोधून आणले

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरी गेलेले मोबाईल शिरुर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मोठया शिताफीने तपास करत नागरीकांना परत केल्याने नागरीकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व पोलिस मित्र दिपक बढे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे राज्याबाहेरील पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, व महाराष्ट्रच्या बीड, सांगोला, पंढरपूर, केसनंद, दौंड, खराडी, नगर या भागातून तब्बल 20 मोबाईल हस्तगत केल्याने शिरुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सन 2021 मध्ये पोलिस मित्र दिपक बढे व पोलिस कर्मचाऱ्यांनी 30 मोबाईल नागरीकांना तपास करत परत केले होते.

शिरुर पोलिस स्टेशनमध्ये मोबाईल हरवण्याच्या व चोरी जाण्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस मित्र दिपक नानासाहेब बढे यांनी तसेच सायबर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी तांत्रिक विश्लेषण करुन शिरुर पोलिसांना तांत्रिक माहीती देवून परराज्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावून ते हस्तगत करत 20 मोबाईल नागरीकांना परत मिळवून देण्यास भरीव योगदान दिले आहे.

शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, महीला पोलीस हवालदार रेखा टोपे, पोलिस अंमलदार प्रवीण पिठले, पोलीस मित्र व तांत्रिक विश्लेषक दीपक बढे यांनी तांत्रीक विश्लेषणकरून 3 लाख 28 हजार रुपये किंमतीचे एकुण 20 मोबाईल फोन शोधले आणि रमेश खाडे, संभाजी जामदार, आत्माराम नढे, ओंकार शिंदे, सुनील इसोकार, दादासाहेब बेंद्रे, वैभव दसगुडे, रामकृष्ण बिडगर या सर्वांना गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शिरुर पोलिस स्टेशन येथे बोलावुन ते त्यांना परत केले आहेत.

उर्वरित १३ मोबाईल सुद्धा मुळ मालकांना परत केले जाणार आहेत. हे सर्वच्या सर्व फोन हे चालु व सुस्थितीत असल्याने मोबाइल धारकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदरच्या कामगिरीत पुणे ग्रामीण सायबरचे पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे, पोलिस अंमलदार सचिन गायकवाड व सुनिल कोळी यांनी तांत्रिक माहीती पुरवुन मोलाचे सहकार्य केले आहे.

अन त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू…

चोरीला गेलेले मोबाईल परत मिळालेल्या नागरीकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दिपक बढे यांनी सॉप्टवेअर क्षेत्रामध्ये शिक्षण घेतले असून त्यांचा या क्षेत्रात तपास करण्यात हातखंडा आहे.त्यांनी आत्तापर्यत तब्बल 50 मोबाईल नागरीकांना परत मिळवून दिले आहेत. त्यामुळे दिपक बढे व शिरुर पोलिसांवर या कामगिरीमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागरीकांनी चोरीचे मोबाईल खरेदी करू नये. बिल असल्याशिवाय खरेदी करू नये. बाजारामध्ये, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वरच्या खिशात ठेवू नये असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.