Money

शिरुरमध्ये नागरीकांचे पैसे बुडवून पतसंस्थेचा अध्यक्ष फरार; ठेवीदारांची निदर्शने…

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवहार ठप्प झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया यांनी ठेवीदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या ठेवी एप्रिलमध्ये परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचे पालन न करता ते पुन्हा फरार झाले असून, त्यांच्यासोबत अन्य संचालक देखील फरार झाल्यामुळे ठेवीदार हवलदिल झाले आहेत.

पतसंस्थेच्या दारात रोज जाऊन वाट पाहू लागले. तब्बल ३० दिवस वाट पाहून त्यांचा हिरमोड झाला. शेवटी त्यांनी संचालकांच्या व्यापारी ठिकाणांवर जाऊन आपल्या भावना व्यक्त करायचा निर्णय घेतला. एकत्रित होऊन सगळ्यांनी संस्थेचे अध्यक्ष अभय चोरडिया आणि विनय संघवी आणि भटेवरा यांच्याशी संबंधित व्यावसायिक ठिकाणी जाऊन निदर्शने केली.

संस्थेत चाललेले आर्थिक गैरव्यवहार सभासद, ठेवीदार, व सहकार निबंधक यांच्यापासून लपवून ठेवण्यात सर्व संचालक, अंतर्गत लेखापरीक्षक आणि संस्थेचे प्रबंधक यांचा सहभाग असल्याने सर्व ठेवीदारांमधे रोष निर्माण झाला. संस्थेशी संबंधित कोणीही ठेवीदारांच्या समोर येण्यास तयार नसल्याने ठेवीदारांनी मेघराज हंसराज चोरडिया, सुवर्णा राजेंद्र भटेवरा, विनय संघवी आणि तज्ञ संचालक उज्वला देसरडा यांच्या व्यापारी आस्थापना व घरासमोर जाऊन प्रतिकात्मक निदर्शने केली. घोषणा दिल्या. याउपरांत त्यांनी ठेवीदारांची रक्कम देण्यासंबंधी काही हालचाल न केल्यास दररोज सर्व जबाबदार संचालकांच्या समोर अशीच निदर्शने व गरज पडल्यास उपोषण व आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मे.मेघराज हंसराज अँड सन्स, मेघहंस सेल्स, मेघहंस एंटरप्रायजेस, मेघहंस असोसिएट्स, गोडगंगा फूड्स एस एल पी या संस्थांनी चेअरमन अभय चोरडिया यांच्यामार्फत संस्थेच्या रकमेचा अपहार करून ठेवीदारांची रक्कम हडप केल्याचे निदर्शनास येत असून अन्य संचालक, लेखापरीक्षक, आणि प्रबंधक यांनी या अफरातफरीवर बऱ्याच काळापासून पांघरूण घालून ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे.

नागरिकांनी आपली कष्टाने कमावलेली रक्कम या सर्व संचालकांच्या विश्वासावर या पतसंस्थेत गुंतविली आहे. अनेक ठेवीदारांना त्यांच्या अडचणीच्या काळात ठेवींच्या रकमा मिळत नाहीत. त्यामुळे हे ठेवीदार आंदोलक अजून तिव्र लढा देण्याच्या तयारीत आहेत. सर्व संचालक स्थानिक व्यापारी असून गडगंज श्रीमंत आहेत. तसेच जवळपास सर्वच ठेवीदार स्थानिक आहेत. त्यामुळे आंदोलन दिर्घकाळ चालू राहून या सर्वांना त्याची झळ सोसावी लागणार आहे. यापुढे आंदोलन आधिक तीव्र करून या संचालकांना व्यवसाय व साधारण जगणे असह्य करण्याचा निर्धार ठेवीदारांनी केला आहे.