Shirur Police Station

शिरूर तालुक्यात विद्युत मोटारी, केबल चोरीचे सत्र सुरूच…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील इनामगाव, आण्णापूर, टाकळी हाजीसह बेट भागातील शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंप, केबल तसेच कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, कमी बाजार भाव त्यात विद्युत मोटारी, केबलची चोरी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील पंधरा दिवसांत जवळपास दिवसाआड ठिकाण बदलून या चोऱ्या सातत्याने होत आहेत.

पोलीस अधीक्षकांनी २७ एप्रिल पासून मागील गुन्ह्यातील दोन मोटार चोरांना तडीपार करत अशा चोऱ्या रोखण्यासाठी गुन्हेगारांना तडीपारीचा इशारा दिला असला तरी शुक्रवारी (ता. २८) पुन्हा टाकळी हाजी, निमगाव दूडे , आण्णापुर या भागातून केबल आणि मोटार चोरी झाल्याने शेतकरी सुरक्षित नसल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे. गेल्या दोन वर्षापासून लाखो रुपयांच्या शेकडो विद्युत मोटारी चोरीला गेल्या असून फक्त १८ मोटारी शोधण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, मोटार चोरांचा शोध घेवून तात्काळ त्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा यापुढे अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले तर शिरूर पोलीस स्टेशन वर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत भाकरे व बाबाजी रासकर यांनी दिला आहे.