karde midc

‘राज’ आश्रय! करडे येथील MIDCच्या टप्पा क्रं 3 च्या मुरुमचोरी प्रकरणी तारीख पे तारीख…

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 3 करडे येथील गट क्रमांक 91, 92/1, 92/2, 93, 94/1, 94/2 मध्ये 14 नोव्हेंबर 2022 पासून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा उत्खनन करण्याची परवानगी नसताना स्टेरीऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या मुरुम उपसा चालू आहे.

संबंधित कंपनीस बेकायदेशीर मुरुम उत्खनन केल्याप्रकरणी एकुण 48 कोटी 50 लाख 87 हजार 415 रुपये शासकीय दंड ठोठावला असतानाही अजूनही या ठिकाणी बेकायदेशीर मुरुम उपसा सुरुच आहे. या मुरुम माफियाना एका राजकीय नेत्याचाच ‘राज’ आश्रय असल्याने हा सगळा सावळा गोंधळ चालला असल्याचा आरोप तक्रारदार दिलीप लोखंडे यांनी केला आहे.

रांजणगाव MIDC टप्पा क्रमांक तीन साठी शासनाने करडे येथे जमीन संपादित केली त्यानंतर तेथे दोन कंपन्याचे काम चालू झाले आहे. त्यापैकी स्टेरीऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामासाठी MIDC च्या आजूबाजूच्या प्लॉट मधून मोठया प्रमाणात मुरुम उपसा करण्यात आला. त्यानंतर दिलीप सुदाम लोखंडे (रा. गोलेगाव) यांनी याबाबत तत्कालीन तहसीलदार यांना याबाबत लेखी तक्रार दिली. त्यानंतर 28 फेब्रुवारी 2023 रोजी 13 कोटी 33 लाख 35 हजार 105 रुपये तसेच 6 मार्च 2023 रोजी 35 कोटी 17 लाख 52 हजार 310 रुपये दंड झाला आहे. एकुण 48 कोटी 50 लाख 87 हजार 415 रुपये शासकीय दंड ठोठावला असून महसूल खात्यापुढे याबाबत कंपनी प्रशासन आणि तक्रारदार यांची सुनावणी सुरु आहे.

परंतु, याबाबत तहसीलदार यांच्या पुढे सुनावणी चालू असतानाही मुरुम माफियांनी बेकायदेशीर मुरुम उपसा सुरुच ठेवला आहे. लाखो ब्रासच्या मुरुमाची राजरोसपणे चोरी होत असताना आणि शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असतानाही महसूल खात्यातले वरिष्ठ अधिकारी गप्प का आहेत. तसेच महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने हा सगळा प्रकार चालू असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे. येथील बांधकाम कंपनीचा मॅनेजर साकिब शेख याला तालुक्यातील एका राजकीय नेत्याचा “राज” आश्रय असल्याने शासकीय कामाच्या नावाखाली गट नंबर 97 मध्ये स्टेरीऑन कंपनीच्या जागेत बेकायदेशीर रित्या मुरुम टाकला जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार दिलीप लोखंडे यांनी केला आहे.