व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात घोड धरणात शासनाने निमोणे आणि चिंचणी या ठिकाणी वाळू डेपो उभारलेले असताना वाळू ठेकेदार हा स्वतःच्याच नातेवाकाच्या नावाने बुकिंग करुन 4500 ते 5000 रुपये ब्रासने अनधिकृत वाळूची विक्री करत आहे. तसेच चिंचणी आणि गुनाट परीसरात आता नवीन वाळू माफिया उदयाला येत असुन त्यांनी घोड धरणातून रात्रीच्या वेळेस वाळू उपसा करण्याचा सपाटाच लावला आहे.

शिरुर तालुक्यातील घोड धरणात वाळूचा लिलाव झाल्यापासुन वाळूडेपो बाबत वाद सुरु आहे. सुरवातीला वाळू डेपो धारकाने घोड धरणातून अनधिकृतरीत्या रात्रं-दिवस वाळू उपसा करत 4500 ते 5000 हजार रुपये ब्रासने काळ्या बाजाराने वाळूची विक्री करण्याचा सपाटा लावला. मात्र सर्वसामान्य लोकांना शासकीय दरात एकही ब्रास वाळू मिळाली नाही.

त्यानंतर वाळूच्या पैशावरुन दोन वाळू ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. तसेच वाळू डेपो धारकाने स्वतःच्या नातेवाईकाच्या नावावर बुकिंग करत वाळूची अनधिकृतपणे विक्री केल्याची निमोणे ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच प्रांत यांच्याकडे लेखी तक्रार केली. तसेच 26 जानेवारी रोजी निमोणे ग्रामपंचायतने वाळू उपसा बंद करण्याबाबत ठराव केला आहे.

त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. सुयोग जगताप यांनी जिल्हास्तर भरारी पथक जिल्हा पुर्नवर्सन अधिकारी कार्यालय, पुणे (पुर्नवसन शाखा) यांना निमोणे (पिंपळाची वाडी) येथील वाळू डेपोच्या अनियमिततेबाबतच्या निवेदनातील १ ते ९ मुद्याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने मुद्देनिहाय नियमानुसार चौकशी करुन 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

 

महसूल व पोलिस खाते यांची डोळेझाक…?

चिंचणी येथील घोड धरणाच्या जवळच गेल्या एक महिन्यापासुन स्थानिक वाळू माफिया बेसुमार वाळू उपसा करत असुन शिरुर तहसील कार्यालय आणि शिरुर पोलिस स्टेशन येथील अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा चालु आहे. तसेच घोड धरणाच्या अगदी जवळच अनधिकृतपणे हा वाळू व्यवसाय चालु असल्याने भविष्यात धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाळू ठेकेदाराचा नवीन प्रताप, स्वतःच्या नातेवाइकांच्या नावे बुकिंग करत अनधिकृत वाळूविक्री

शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात

शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली लाखों रुपयांची वाळूचोरी