शिरूर तालुक्यात त्या ग्रामीण रुग्णालयातील औषधाचा साठा संपला, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क औषधाचा साठा संपल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

या रूग्णालयाची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश जाधव यांनी गावातील सूचना फलकावरच “औषधे संपली आहेत, कृपया पुरवठ्यासाठी सहकार्य करा” अशी नोटीस लिहिली. गेल्या तीन महिन्यांपासून मागण्या करूनही औषध पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नेमलेले वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी क्वचितच हजेरी लावतात. काहीजण आठवड्यातून दोन दिवस येऊन ठरलेला वेळ संपला की निघून जातात. परिणामी रुग्णालयाचा कारभार प्रभारी अधिकारी, परिचारिका आणि कर्मचारी यांच्या भरोशावर सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा ग्रामीण रुग्णालयापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहेत, अशी येथील स्थिती आहे. आश्चर्य म्हणजे, या गंभीर प्रश्नाकडे आमदार- खासदार आणि वरिष्ठ अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागनाथ यमपल्ले यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मग वरीष्ठ अधिकारी नेमके करताय तरी काय? गोळ्यांअभावी गरीब रुग्णांवर माघारी जाण्याची वेळ येत असेल तर ही अतिशय खेदजनक घटना आहे.

दृष्टीक्षेपातील स्थिती

रुग्णालय व निवासस्थानाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण

औषधांचा साठा तुटपुंज्या स्वरूपात उपलब्ध

वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी नियमित येत नाही.

वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे समस्येकडे उघड दुर्लक्ष

“गेल्या तीन महिन्यांपासून मागणीनुसार औषध पुरवठा मिळत नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नाईलाजास्तव गावातील सूचना फलकावर नोटीस लिहावी लागली.”

डॉ. राजेश जाधव,

 प्रभारी वैद्यकीय अधिकारी, मलठण

“ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरवठा उपलब्ध आहे. काही लोकांकडून जाणीवपूर्वक बदनामी केली जाते आहे. गावातील फलकावर नोटीस का लिहिली, याची माहिती नाही.”

डॉ. अतूल नागरे, 

वैद्यकीय अधीक्षक, मलठण