रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत दोन किराणा दुकान फोडणाऱ्या दोन आरोपीना अटक; एक आरोपी बांगलादेशी

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव व रांजणगाव गणपती या गावातील दोन किराणा दुकानात चोरी करणाऱ्या तीन आरोपी पैकी शेख इम्रान शाहिद भाई (वय 24) सध्या रा. कारेगाव ता.शिरुर जि.पुणे मुळ रा. शक्तीनगर,जि.सुरत राज्य. गुजरात आणि राजु शेख फरहद शेख (वय 27) सध्या रा.कारेगाव ता.शिरुर जि.पुणे मुळ रा.दौडाइल, जिल्हा ठाणा. कालिया गाव पेडोली, पोस्ट पेडोली, देश बांग्लादेश या दोन जणांना अटक करण्यात रांजणगाव पोलिसांना यश आले असुन एक आरोपी पळुन गेला आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत दि 12 ऑक्टोबर 2023 रोजी 9:30 च्या दरम्यान कारेगाव गावच्या हद्दीत बाभुळसर रोडवर असणाऱ्या शुभम सुपर मार्केट या किराना मालाच्या दुकानात खिडकीची काच फोडून गज वाकवून सुमारे 45 हजार रुपयांची चोरी झाली होती. याबाबत सोमनाथ नर्सिंग मुळे (वय 48) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर दि 16 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 1 च्या सुमारास रांजणगाव गणपती येथील मातोश्री ट्रेडिंग कंपनी या किराणा मालाच्या दुकानाच्या मागील बाजूचा लाकडी व लोखंडी दरवाजा तोडून दोन अज्ञात चोरट्यानी 1 लाख 77 हजार 400 रुपये किमतीचा माल चोरुन नेला होता. याबाबत गुलाब पंढरीनाथ देशमुख (वय 28) यांनीही रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

 

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत दोन किराणा मालाची दुकाने फोडण्याचे प्रकार घडल्याने या घटनेचा तपास लावण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ तसेच विजय शिंदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता रांजणगाव येथील मातोश्री ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन आरोपी चोरी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन तीन आरोपीपैकी दोन जणांना अटक करत त्यांच्याकडून किराणा दुकानातील साहित्य व रक्कम ताब्यात घेतली आहे. एक आरोपी पळुन गेला आहे.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ पोलीस विजय शिंदे यांनी केली असुन या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गुलाब येळे व पोलीस नाईक राजेश ढगे हे करत आहेत.