घशाची खवखव म्हणजे काय…?

आरोग्य

घशाची खवखव हे अ‍ॅलर्जी किंवा घशाच्या संसर्गाचे सामान्य लक्षण आहे. यामुळे रुग्णास वेदना आणि अस्वस्थपणा जाणवतो परंतु घरी काळजी घेतल्याने तसेच औषधांनी हे बरे करता येते. याच्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बरेचदा घशाची खवखवीबरोबर इतरही लक्षणे दिसून येतात जसे की:

1) रुग्णास सतत खोकला येतो आणि त्याचबरोबर सर्दी आणि शिंका येतात.

2) सायनसेसमध्ये अडथळे आल्यामुळे चेहरा आणि डोके जड होते.

3) डोळ्यांना खाज सुटते आणि हाता पायाच्या त्वचेलाही खाज सुटते.

4)अंतर्गत संसर्गाची शक्यता असल्यामुळे घशाची खवखव होणार्‍या रुग्णास तापही येतो.

5) घशाची खवखव अ‍ॅलर्जीमुळे होत असेल तर रुग्णास पोटदुखी, मळमळ आणि चक्करही येऊ शकतात.

6) रुग्णाच्या त्वचेवर चट्टे किंवा इरप्शन्स येऊ शकतात.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

1) अ‍ॅलर्जीक र्हायनायटीस हे घशाच्या खवखवीचे प्रमुख कारण आहे. ह्याला हे फिव्हरही म्हणतात जो शरीराच्या अतिकार्यशील प्रतिकारक शक्तीमुळे होतो.

2) घशाची खवखव आणि वाहणारे नाक या अ‍ॅलर्जीचा अजून एक प्रकार म्हणजे विशिष्ट पदार्थांची, धुळीची, सुगंधांची अ‍ॅलर्जी. प्रदूषणाचाही या प्रकारात प्रमुख सहभाग असतो.

3) सूक्ष्मजीवांमुळे होणारा संसर्ग हेही घशाच्या खवखवीचे कारण असते. सामान्यत: स्ट्रेप्टोकॉकस (जीवाणू) मुळे हा संसर्ग होतो.

4) गंभीर प्रमाणात झालेले निर्जलीकरण आणि आम्लपित्तयामुळेही घशाची खवखव होऊ शकते.

5) धूम्रपान आणि मद्यप्राशन हेही घशाच्या खवखवीचे कारण बनते किंवा त्याचा त्रास वाढवते.

आयुर्वेद व घरगुती उपाय

बदलत्या हवामानामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये सर्दी, खोकला आणि त्यामुळे घसा खराब होणे यासारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. घशामध्ये खवखव होण्यासोबतच बोलतानाही त्रास होतो. तसेच सतत खवखव होण्यामुळे जेवताना, पाणी पितानाही घशाला त्रास आणि वेदनाही होतात. घशामध्ये वेदना या बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होत असून यामुळे सूजही येते. घशातील वेदना आणि सूज दूर करण्यासाठी काही घरगूती उपाय जाणून घेऊयात.

मीठ आणि गरम पाणी: घशात होणाऱ्या खवखवीपासून सुटका करून घेण्यासाठी मीठ आणि गरम पाणी हा उत्तम पर्याय मानला जातो. यासाठी एक ग्लास पाणी गरम करून त्यात थोडं मीठ मिश्रित करा. या पाण्याने दिवसातून दोन-तीनदा गुरळा करा. यामुळे घशातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.

लिंबू आणि गरम पाणी: एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

हर्बल चहा: मिरी, तुळस आणि लवंग यांसारखे पदार्थ घालून बनवलेला चहा हा उत्तम उपाय मानला जातो. यामुळे घशातील खवखव, वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

हळदीचे दूध: गळ्याच्या वेगवेगळ्या तक्रारींवर उपाय म्हणून हळदीचे दुध गुणकारी ठरते. यामुळे गळ्याला झालेले इन्फेक्शन दूर होतात.

मध: मध खोकला आणि घशातील वेदना कमी होण्यासाठी उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे मध घ्या. त्यामुळे आराम मिळेल.