श्वानाने सार्वजनिक ठिकाण घाण केल्यास मालकावर होणार कारवाई…

महाराष्ट्र

नागपूर: नागपूर महानगरपालिकेने नुकतेच सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे, थुंकणे तसेच कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. आता पुढच्या टप्प्यात शौचास पाळीव श्वान घेऊन रस्त्यांवर येणाऱ्या श्वान मालकांवर दंड आकारण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे. श्वान मालकांकडून पुढील महिन्यांपासून दंड आकारणी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान मंगळवारी एका दिवसातच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून 85 हजार 50 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी आहेत. अनेक जण घरातील श्वानासह सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर फिरण्यास निघतात. श्वानांचा प्रातःविधी हाच सर्वांचा हेतू असतो. यामुळे शहरात अस्वच्छता पसरत असून आरोग्याच्याही समस्या निर्माण होत आहेत.

काही वर्षांपूर्वी महानगरपालिका श्वान मालकांवर दंड आकारत होती. नंतर दंड आकारणेच बंद करण्यात आले होते. आता पुन्हा महानगरपालिकेने श्वान मालकांवर (Pet Owners) दंड आकारण्यासाठी नव्या नियमांसह पावले उचलण्याचा निर्धात केला आहे. त्यामुळे श्वान मालकांकडून मोठी दंड वसुली होणार आहे.

कचरा टाकणाऱ्यांकडून 31 हजार 200 वसूल

दरम्यान, महानगरपालिकेने आजपासून सार्वजनिक ठिकाणांवर अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी 84 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. यात लघवी करणारे, कचरा फेकणारे, थुंकणारे तसेच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांचा समावेश आहे.

उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची 78 प्रकरणांची नोंद केली. यातून 31 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. सार्वधिक 33 प्रकरणे लक्ष्मीनगर झोन, 20 प्रकरणे गांधीबाग झोन, आणि 7 प्रकरणे मंगळवारी झोनमध्ये नोंदवण्यात आली. या सर्वांवर प्रत्येकी 400 रुपयाप्रमाणे दंड आकारण्यात आला.

प्रत्येकी शंभर रुपयांपासून 400 पर्यंत दंड वसूल

रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर ठिकाणी कचरा टाकणाऱ्या 53 जणांकडून प्रत्येकी 100 रुपये दंड वसूल करण्यात आला. दुकानदारांकडून रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर कचरा टाकण्याची 34 प्रकरणे नोंद करण्यात आली असून प्रत्येकी 400 रुपये दंड वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेसविरुद्ध आशीनगर झोनमध्ये एक प्रकरणाची नोंद करण्यात आली असून एक हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

जनावरे बांधणाऱ्यांवर कारवाई

जनावरे बांधण्याचेही मंगळवारी झोनमध्ये एक प्रकरण उघडकीस आले असून त्याच्याकडून एक हाजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच इतर 42 व्यक्तीकडून 8400 रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणाऱ्या संस्थांकडून 23 प्रकरणांमध्ये 23000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात विविध झोनच्या उपद्रव शोध पथक प्रमुखांनी जवानांसोबत केली.