कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान

शिरूर तालुका

शिक्रापूर (किरण पिंगळे): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्र काही कामानिमित्ताने कर्नाटक मध्ये गेलेले असताना शिक्रापूर येथे एका ठिकाणी निघालेल्या मांढूळ सापाला सर्पमित्रांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मित्रांनी पकडून निसर्गात मुक्त केल्याने कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान दिल्याचा प्रकार घडला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडिया बुक ऑफ रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर हे काही मित्रांसमवेत कर्नाटक मध्ये गेलेले असताना शिक्रापूर येथील औरा सिटी रोडचे कडेला एक साप असून तेथे काही नागरिक सापाला त्रास देत असल्याचे शुभम माने या युवकाला दिसले. त्यावेळी त्याने तातडीने शेरखान शेख यांना व्हिडिओ कॉल करत सापाची परिस्थिती दाखवली. यावेळी शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी येथील साप हा मांढूळ साप जातीचा साप असून शुभम यास सापाबाबत योग्य माहिती देत सापाला पकडण्यास मार्गदर्शन केले.

दरम्यान शुभम याने सापाला पकडले तर याच वेळी शेरखान शेख यांनी शिरुर वनविभागाचे वनरक्षक प्रमोद पाटील यांना माहिती दिली त्यांनतर शुभम माने यांनी सदर सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले. मात्र सर्पमित्र कर्नाटक मध्ये असताना देखील सापाला जीवदान मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.