china-girl

चीनची नवरी झाली अहमदनगर जिल्ह्याची सून…

महाराष्ट्र

अहमदनगरः चीनची युवती अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील युवकाच्या प्रेमात पडली आणि बघता बघता संगमनेरची सून झाली. सध्या या लग्नाची महाराष्ट्रात तुफान चर्चा रंगली आहे. चीनमध्ये रजिस्टर मॅरेज करुन त्यांनी संगमनेर येथे पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. या विवाह सोहोळ्याला अख्खे गाव उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावात राहणारा राहुल हांडे हा चीनमध्ये गेल्या सात आठ वर्षापासून योगाचे धडे देत आहे. योग शिक्षक म्हणून काम करताना चीनमधील यान छांग या मुलीशी त्याचे सुत जुळले आणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. चीनमध्ये त्यानी रजिस्टर लग्न केल्यानंतर राहुल यान छांग हिला घेऊन आपल्या गावी आला आणी पारंपारिक हिंदू पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत पुन्हा लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. हळदीपासून सर्व विधी पार पडताना यान छांग अगदी भारावून गेली होती.

राहुल जेव्हा तिला संगमनेरला घेऊन आला तेव्हा येथील वातावरण आणि निसर्ग बघून यानला खूप आनंद झाला. पारंपारिक लग्नात पार पडलेले विधी तिने कधी बघितले नव्हते. चीनमध्ये अगदी पंधरा मिनिटात लग्न पार पडते. मात्र भारतात पाच दिवस लग्न विधी केले जातात. लग्नविधी संपल्यानंतर राहूल आता पुन्हा चीनला रवाना होणार आहे. अजून काहीवर्ष चिनमध्ये योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा पुन्हा भारतात येण्याचा मानस आहे. मात्र एखाद्या ग्रामीण भागातील युवकाने चिनच्या मुलीशी लग्न केले या विषयाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

महाराष्ट्राची संस्कृती बघून शान छांग भारावून गेली असून राहुल सुद्धा तिला सर्वांशी ओळख करुन देत सर्व रुढी परंपरा समजावून सांगत आहे. विवाहसोहळ्यात बोलताना नवरीने चक्क ‘कसे आहात’ हे मराठीत म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हळदी, मिरवणूक व मंगलाष्टके अशा पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात भारतीय संस्कृतीप्रमाणे पार पडलेला विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.