राज्यपालांच्या अभिभाषणावर काँग्रेसचा जोरदार हल्ला; ‘५ ट्रिलियन’ गप्पांवर विजय वडेट्टीवारांचा सवाल

महाराष्ट्र

मुंबई: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा अवमान करायचा, हे या सरकारचे धोरण आहे.

‘महापुरुषांचा केवळ राजकीय वापर’

राजभवनात बसून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान करणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ राजकारणासाठी महापुरुषांची नावे वापरली जात आहेत, अशी टीका करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समानतेच्या विचारांचा सरकारकडून अवमान होत असल्याचे म्हटले. काही मंत्री समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘१ ट्रिलियनचे काय झाले?’

राज्यपालांनी अभिभाषणात सरकारच्या २०४७ च्या ‘व्हिजन’चे चित्र रंगवले. मात्र, २०२४ मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करण्याचे आश्वासन देणारे हेच सरकार आता थेट ५ ट्रिलियनची भाषा करत आहे. “एक ट्रिलियनचे काय झाले, हेच माहित नाही आणि २०२६ मध्ये २०४७ ची भाषा करणे संयुक्तिक आहे का?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

शिक्षण आणि आरोग्यावरून टोला

राज्यातील २२०० शाळांमध्ये शिक्षक नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मराठी शाळा बंद पडत असल्याची खंत व्यक्त केली. कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी खर्च करणाऱ्या सरकारने त्यातील २ हजार कोटी शिक्षणासाठी द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. “रुग्णवाहिका दुरुस्त करायला पैसे नाहीत आणि ५ ट्रिलियनच्या गप्पा मारल्या जात आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

कमिशनखोरी, जंगल जमीन आणि शेतकरी प्रश्न

राज्यात कमिशनखोरी वाढल्याचा आरोप करत औषध उत्पादक कंपन्यांना दप्तर बनवण्याचे कंत्राट देऊन मर्जीतील लोकांचे खिसे भरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगतची जमीन उद्योगपतींना देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत, १० कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात जंगलतोड सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचे नमूद करत यवतमाळ आणि अमरावतीतील परिस्थिती भीषण असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जामुळे शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असल्याचा उल्लेख करत, अभिभाषणात कर्जमुक्तीचा साधा उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दावोस करारांवर श्वेतपत्रिकेची मागणी

दावोस येथे जाऊन केलेले करार हे आकड्यांचा फुगवटा असल्याचा आरोप करत, प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाला याबाबत सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.