छत्रपती संभाजीनगरात ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी

महाराष्ट्र

जी-20 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय..

औरंगाबाद: उद्या म्हणजेच 26 फेब्रुवारीपासून जी-20 परिषेदचं महिला शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. 25 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून 02 मार्चपर्यंत जी-20 परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरिता वापर करण्यास मनाई आदेश पोलिसांनी काढला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात, 27 ते 28 फेब्रुवारी कालावधीत G-20 परिषद असल्याने सदर परिषदेकरता विविध देशातील व आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रतिनिधी हे 25 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यापीठ लेणी, बीबी का मकबरा व इतर स्थळांना भेटी देणार आहे. त्यामुळे जी 20 परिषदेतील प्रतिनिधी यांचे जिवीतास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये व ते राहत असलेल्या मुक्कामाचे ठिकाणी, भेटी देणारे इतर महत्वाचे स्थळाचे भागात सदरवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असून त्यामुळे अशा ठिकाणी काही असामाजिक तत्वाकडुन तसेच अन्य व्यक्तीकडुन ड्रोनचा वापर करुन घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.

याकरिता हॉटेल रामा इंटरनॅशनल जालना रोड, छत्रपती संभाजीनगर व विद्यापीठ लेणी छत्रपती संभाजीनगर, बीबी का मकबरा व इतर स्थळांचे सभोवताली सुमारे दोन कि.मी.चे परिघातील परिसरात 25 फेब्रुवारी रोजी पासून 2 मार्चपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरिता वापर करणारे ड्रोन चालक, मालक, संस्था, आयोजक व नागरिक यांना ड्रोन न वापरणेबाबत सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्याबाबत माझी खात्री झालेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात खबरदारीचे उपाय म्हणुन, 25 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत जी-20 परिषदेचे अनुषंगाने ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरता वापर करण्यास मनाई आदेश देत, असल्याच पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.