एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! आरक्षण नसतानाही महापालिकांवर शिवसेनेच्या लाडक्या बहिणींचा शिक्का

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यभर महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये यंदा अनपेक्षितपणे महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही महापालिकांमध्ये महापौरपद महिलांसाठी आरक्षित नसतानाही शिवसेनेने महिला नगरसेविकांवर विश्वास टाकत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ‘लाडक्या बहिणींना’ महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेत शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण-डोंबिवली महापालिकेत हर्षाली थविल चौधरी तर उल्हासनगर महापालिकेत अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे.

महायुतीचाच महापौर होणार हे निकालानंतर स्पष्ट झाले होते. मात्र महापौरपदासाठी महिलांची निवड होईल, अशी अपेक्षा फारशी नव्हती. कारण या तिन्ही ठिकाणी महिला आरक्षण लागू नव्हते. त्यामुळे पुरुष उमेदवारांनाच संधी मिळेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अंदाज चुकीचा ठरवत महिलांना नेतृत्वाची संधी दिली आहे.

लाडक्या बहिणींनी शिवसेनेला निवडणुकीत भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे महापौरपद देताना महिलांनाच प्राधान्य द्यावे, अशी ठाम भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

महिलांसाठी पद आरक्षित नसतानाही जाणीवपूर्वक महिलांना संधी देण्यात आल्याची ही या तीनही महापालिकांच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. महिलांना आरक्षणाची वाट न पाहता कुवतीनुसार संधी मिळावी, या विचारातून हा निर्णय घेण्यात आल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतही शिवसेनेच्या महिलांचा वरचष्मा

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या एकूण २९ नगरसेवकांपैकी १९ महिला नगरसेविका आहेत. मुंबईतील युतीच्या जागावाटपात शिवसेनेला ९० जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी तब्बल ६३ जागांवर महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती, हे विशेष उल्लेखनीय आहे.

नगरपालिकांमध्येही ‘लाडक्या बहिणींचे’ वर्चस्व

नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचे ६० नगराध्यक्ष निवडून आले असून त्यापैकी ३३ महिला आहेत. त्यामुळे केवळ महापालिकाच नव्हे, तर नगरपालिकांमध्येही शिवसेनेच्या लाडक्या बहिणींचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे चित्र आहे.