राज्यपाल कोश्यारी देणार राजीनामा; मोदींना दिलेल्या पत्रात ‘हे’ सांगितलं कारण…

महाराष्ट्र

औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती.

अखेर राज्यपालांनी स्वतःच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असून आता आपण आपला उर्वरित वेळ अध्ययन, मनन, चिंतन याकामी सार्थकी लावणार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती आहे. परवा पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी मोदींकडे राजीनामा पत्र दिल्याची माहिती आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याविरोधात राज्यामध्ये जनआक्रोश निर्माण झाला होता. त्यांनी उचलबांगडी करावी, अशी मागणी अनेकांनी केली. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.

आता अखेर खुद्द कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते पायउतार होऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यांनी राजीनामा पत्र पंतप्रधानांकडे दिल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे.