grampanchayat

राजकारण! पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचाचे केले अपहरण; कारण…

महाराष्ट्र

औरंगाबाद : पेंडेफळ (ता. वैजापूर) गावात चक्क एका पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचांचेच अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वास ठराव आणण्याच्या कारणावरून हे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी शिऊर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल रामकृष्ण चव्हाण (वय 75, रा.पेंडेफळ, वैजापूर) असे अपहरण करण्यात आलेल्या उपसरपंचाचे नाव आहे.

उपसरपंच विठ्ठल चव्हाण यांचे पुत्र नवनाथ चव्हाण यांनी शिऊर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ‘वडील विठ्ठल चव्हाण हे पेंडेफळ गावचे उपसरपंच आहेत. गावातील ग्रामपंचायतमधील काही सदस्यांनी येथील सरपंचावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला होता. तर, 7 सप्टेंबर रोजी कुटुंबातील सर्व सदस्य रात्री सोबत जेवले. त्यानंतर विठ्ठल चव्हाण हे बाजुच्या खोलीत झोपायला गेले. मात्र, रात्री साडेअकरा वाजता त्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांचे पुत्र नवनाथ चव्हाण घराबाहेर आले असता तोंड बांधलेले काही लोक त्यांच्या वडीलांना एका वाहनात नेत होते. नवनाथ चव्हाण यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडीत आलेले लोकं त्यांच्या वडीलांना घेऊन पसार झाले. त्यामुळे, सरपंच पती शिवाजी आबाराव आहेर आणि सोपान शिवाजी आहेर यांच्या सांगण्यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी माझ्या वडीलांचे अपहरण केल्याचा संशय असल्याचे चव्हाण यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.’

पेंडेफळचे सरपंच मनिषा आहेर यांच्यावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यामुळे यावर शुक्रवारी (ता. 8) दुपारी दोन वाजता ठराव पारित केला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे एक दिवस आधीच रात्री साडेअकरा वाजता उपसरपंच विठ्ठल रामकृष्ण चव्हाण यांचे अज्ञातांनी अपहरण केले. या प्रकरणी गावात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे अविश्वास ठराव बारगळला आहे. मात्र, चक्क एका पंच्याहत्तर वर्षीय उपसरपंचांचेच अपहरण केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सरपंचपद नडले! सरपंच आणि उपसरपंचाच्या मारहाणीत सदस्याचा मृत्यू…

माजी सरपंचाचा साडूनेच काढला काटा; मेहुणी आणि पत्नीवरही वार…

उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

राज्यात दोन उपमुख्यमंत्री तर दोन उपसरपंच पद्धतही लागू करा…