शिरुर तालुक्यात कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

क्राईम शिरूर तालुका

पुणे-नगर महामार्गावर व्हर्लपुल कंपनीसमोर दोन कंटेनरची कारला धडक

रांजणगाव गणपती: पुणे-नगर महामार्गावर पुण्यावरुन अहमदनगरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने ती कार डिव्हायडरवरुन पलीकडे गेल्याने अहमदनगर वरुन पुण्याकडे निघालेल्या कंटेनरनची या कारला धडक बसल्याने कार मधील लिलाबाई बबन काळे (वय 67) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन याबाबत दिलीप बबन काळे यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप काळे हे आज आपल्या चारचाकी क्रं एम एच १२ ई एम ५९८३ मधुन त्यांच्या आई लिलाबाई काळे यांच्या सोबत पुण्यावरुन अहमदनगरला निघाले होते. दुपारी दोनच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर व्हर्लपूल कंपनीच्या समोर दुपारी ३:३० च्या सुमारास काळे यांच्या कारच्या पाठीमागून येणाऱ्या एका कंटेनरची (एन एल ०१ ए ई ७१६४) जोरदार धडक बसल्याने कार रोडच्या मध्यभागी असणाऱ्या डिव्हायडरवरुन पलीकडच्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी अहमदनगर कडुन पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरने (एम एच १२ एम व्ही ६१६१) काळे यांच्या कारला डाव्या बाजुने धडक दिल्याने चारचाकीत मागच्या सीटवर बसलेल्या लिलाबाई काळे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, पोलिस कॉन्स्टेबल सुरज वळेकर, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चारचाकी गाडीला पाठीमागून धडक देणाऱ्या मारुती माधव कलाल (वय ३२) रा. जांब ता. मुखेड जि. नांदेड या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पुढील तपास करत आहेत.