पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक भागांसह शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकुळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये काहींनी आपला जीवही गमवला आहे. ग्रामीण भाग किंवा दाट लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर अनेकदा पाहायला मिळतो. मात्र, आता पुण्यातील विमानतळावरच थेट बिबट्या पोहोचला आहे.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास पुन्हा बिबट्या दिसला आहे. पुणे विमानतळावरून विमानांची मोठ्या प्रमाणात रात्रीही वाहतूक सुरू असते. त्यामुळे रात्रीच्या वेळीही इथे नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. गेल्या दोन दिवसांत दोन वेळा बिबट्याचे दर्शन घडले आहे. टॅक्सी वे क्रमांक के -4 इथे हा बिबट्या दिसला. बिबट्या ज्या ठिकाणी आढळून आला, त्या ठिकाणाहून काही अंतरावरच पार्किंग बे क्रमांक 8, 9 आणि 10 आहेत. रात्रीच्या वेळी या तिन्ही ठिकाणी विमानं थांबली होती. मात्र, सुदैवाने बिबट्या धावपट्टीवर आला नाही. हा बिबट्या याच आठवड्यात दोनदा धावपट्टीजवळ आढळून आला आहे. मंगळवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री बिबट्या टॅक्सी वे – ४च्या परिसरात आढळून आला आहे.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला प्रथम हा बिबट्या दिसला. त्यानंतर गुरुवारी ग्राउंड स्टाफच्या काही कर्मचाऱ्यांना तो दिसला. वन विभागाने याआधीच विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असणाऱ्या विमानतळाच्या संरक्षक भिंतीची डागडुजी करण्यासंदर्भात कळवले आहे. मात्र, अद्याप ही भिंत तशीच आहे. विमानतळ प्रशासनाने या पत्राची दखल घेतलेली नाही. त्याच भिंतीमधून बिबट्या विमानतळाच्या आत दाखल झाला असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याला पकडण्यासाठी लोहगावच्या परिसरात पिंजरे लावले आहेत. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्यावर नजरही ठेवली जात आहे.
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; डरकाळ्यांनी धास्तावलेले ग्रामस्थ…
Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला
चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…
शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…