शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात सलग तीन निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नागरीक आक्रमक झाले होते. यानंतर ०४ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास एका बिबट्याला ठार करण्यात शार्पशूटर व वनविभागाला यश आले आहे. तब्बल वीस दिवसांपासून भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या या बिबट्याला वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (ता. ४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचूक नेम साधून ठार मारण्यात आले.
१२ ऑक्टोबर रोजी ५ वर्षांच्या शिवन्या शैलेश बोंबे हिच्यावर, २२ ऑक्टोबर रोजी ८२ वर्षीय भागुबाई रंगनाथ जाधव यांच्यावर, तसेच २ नोव्हेंबर रोजी १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवला होता. या सलग घटनांमुळे पिंपरखेड व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेविरोधात नागरिकांचा संताप ओसंडून वाहत होता. बिबट्याच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १२ आणि २२ ऑक्टोबर रोजी पंचतळे येथे बेल्हे-जेजुरी राज्यमार्ग रोखला, तर ३ नोव्हेंबर रोजी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग तब्बल १८ तास ठप्प ठेवून तीव्र आंदोलन केले. संतप्त जमावाने पिंपरखेड येथील वनविभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून दिली होती.
पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांची तातडीने परवानगी घेऊन बिबट्याला जेरबंद अथवा ठार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुणे येथील “रेस्क्यू” संस्थेचे तज्ज्ञ डॉ. सात्विक पाठक (पशुवैद्यक), शार्पशूटर जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दिवसभर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून आणि थर्मल ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात आला. ०४ रोजी रात्री १०:३० ला बिबट सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर दिसला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरला. चवताळलेल्या बिबट्याने प्रतिहल्ला करताच शार्पशूटरांनी अचूक नेम साधला आणि रात्री १०.३० वाजता बिबट ठार झाला. अंदाजे पाच ते सहा वर्षांचा असलेल्या या बिबट्याचा शेवट होताच परिसराने सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर पिंपरखेड येथील ग्रामस्थांना सदर बिबट्याचे शव दाखविण्यात आले. पश्चात त्याचे शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले.
संबंधित कारवाई वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस व अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे तसेच रेस्क्यू संस्थेचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पडली. या धाडसी कारवाईनंतर पिंपरखेड येथील नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले असून, जेवढे दिसतील तेवढे बिबटे ठार मारा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…
बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…
शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…
शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…
शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…
शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी