नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी लोकसभेत घडलेल्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा कथित प्लॅन आखल्याचा धक्कादायक दावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आणखी एक गंभीर दावा करत वादाला नवे वळण दिले आहे.
पंतप्रधान मोदींशिवाय काँग्रेसच्या महिला खासदारांच्या टार्गेटवर आणखी एक खासदार होता. “मी स्वतः त्या वेळी लोकसभेत उपस्थित होतो. परिस्थिती अत्यंत भीतीदायक होती. काही विरोधी खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला चारही बाजूंनी घेरले होते. काय घडू शकते, याचा अंदाज येत नव्हता,” असे गोयल म्हणाले.
मोदींचे भाषण रद्द का झाले?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भाषण होणार होते. मात्र कथित हल्ल्याच्या प्लॅनची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधानांना लोकसभेत येऊ नये, असा सल्ला देण्यात आल्याचे ओम बिर्ला यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण न होता आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
कोण होते निशाण्यावर?
न्यूज १८ वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या महिला खासदारांच्या निशाण्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे होते. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही महिला खासदार अध्यक्षांसमोरील जागेत जमल्या आणि नंतर पंतप्रधानांच्या आसनाकडे गेल्या. यावेळी त्यांची नजर निशिकांत दुबे यांच्यावर पडताच त्या त्यांच्या दिशेने जाऊ लागल्याचे सांगितले जाते.
याच क्षणी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी दुबे यांना इशारा करत सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. काही सेकंद दोघांमध्ये संवाद झाल्याचेही दिसून आले, अशी माहिती आहे.
वादाचे मूळ काय?
निशिकांत दुबे यांनी यापूर्वी लोकसभेत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी संबंधित काही पुस्तकांचे संदर्भ देत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. यावरून काँग्रेस खासदारांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यामुळेच दुबे हे महिला खासदारांच्या रोषाचे लक्ष्य ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेसचा आरोप फेटाळला
दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महिला खासदार केवळ बॅनर दाखवून शांततामय विरोध करत होत्या. कोणताही हल्ल्याचा प्लॅन नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.