मराठवाडा मुक्ती संग्राम हा देशाला दिशा देणारा संग्राम; डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

मुंबई: निझामाच्या काळात स्त्रियांना अत्याचार, अन्यायापासून, शेतकऱ्यांना जुलमी पद्धतीपासून, स्वाभिमानापासून तिलांजली द्यायची वेळ येत होती. त्या सगळ्यांबद्दलचा हा आत्मसन्मानाचा लढा आहे. त्यामुळं आपण या लढ्याला मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणत असलो तरी हा महाराष्ट्राला, देशाला दिशा देणारा संग्राम आहे. हा लढा जुलमी राजवटीच्या विरोधातील एक मार्गदर्शक असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या प्रस्तावावर डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या संग्रामात सीमाभागातील अनेक गावांना अन्याय, अत्याचाराला सामोरे जावे लागले. यामध्ये अनेक ग्रामीण स्त्रियांचे विशेष योगदान राहिले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील सोनूबाई पाटील यांनी गनिमी कावा करीत जमादारावर शस्त्राने सपासप केलेल्या वाराची थरारक घटना सांगितली. त्याचप्रमाणे ईट तालुका भूम येथील वीर महिला गोदावरी किसनराव टेके या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्वतः बंदूक चालवायला शिकल्या आणि त्यांनी रझाकारावर गोळीबार करून त्यामध्ये एका रझाकराला मारल्याची घटना डॉ. गोऱ्हे यांनी सांगीतली.

मराठवाडा मुक्ती संग्रामात काही महिलांचे ‘गट’ देखील कार्यरत असल्याचे दाखले आहेत.यामध्ये श्रीम. गोदावरी टेके, दगडाबाई शेळके, डॉ. शुभदा धारूरकर, लता बोधनकर, बकुला पेडगावकर, सीताबाई चारठाणकर, कमला देशपांडे, प्रतिभा वैशंपायन, सुशीला दिवाण, आशाताई वाघमारे, सुशीला भालेराव, कॉम्रेड करुणा चौधरी, डॉ. तारा परांजपे, सुनंदा जोशी, सुमित्रा वाघमारे, गंगुबाई देव, विमल नलकोटे, संगम लक्ष्मीबाई (तेलगू)हे कार्यरत होते असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. याशिवाय काही अज्ञात स्त्रियांची नावे नसतील. संशोधन प्रक्रिया ही अखंड चालू असते. या मुक्तीसंग्रामातील अनेक ज्ञात अज्ञात शूरवीर महिलांचा सहभाग यामध्ये होता. आजच्या या ठरावाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला वंदन करत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले.

उदगीर जिल्हा लातूर येथे काहीकाळ डॉक्टर म्हणून काम करत असताना, आर्य समाजाची परंपरा जवळून पाहता आली. सर्वच समाजाला बरोबर घेऊन जाणारी अत्यंत प्रागतिक अशी परंपरा आर्य समाजाची असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. मराठवाडा मुक्ती संग्राम हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सभागृहातील सदस्यांनी आपापल्या भागात यासंबंधीची भाषणे केली पाहिजेत यातून जनतेला रणसंग्रामाची पुन्हा एकदा आठवण होईल आणि यातील हुतात्म्यांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचेल.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा…

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आपण सर्वजण साजरे करत आहोत. या निमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास येणाऱ्या पिढीतील विद्यार्थ्यांना मागील पिढीतील नागरिकांनी केलेला संघर्ष व बलिदान याचे स्मरण राहील. याकरिता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत मांडलेला प्रस्ताव आज एकमताने मंजूर करण्यात आला.