… तर किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोहीच, थांबवा हा राजकीय नंगेपना हा असा असतो का स्त्रीसन्मान?

महाराष्ट्र

मुंबई: स्त्रीसन्मानाच्या गोष्टी करणारे देशाचे पंतप्रधान किती स्त्रीसन्मान राखतात हे दिल्लीतील कुस्तीगीर खेळाडूंच्या दोन महिने चाललेल्या आंदोलनातून दिसून आले.

महिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने त्या महिलांना आंदोलन करावे लागेल आणि त्यांची फरपट कशाप्रकारे झाली हेही जगाने पाहिले आणि आता तर स्वतःला भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ म्हणणारे “हातोडा सम्राट” माजी खासदार कीरिट सोमय्या यांच्यां कथित सेक्सटॉर्शनच्या व्हिडिओ क्लिप वायरल झाल्या मग चर्चेचा सुरुवात झाली असा असतो का स्त्री सन्मान? हा लेख लिहित असतानाच मणिपुर मधील दोन कुकी महिलांची नग्न धिड काढून त्यांच्याशी बिभत्स चाळे करणाऱ्या झुंडीचा आणि मग सामुहिक बलात्कार असा भयंकर प्रकार समाज माध्यमातून समोर आला ते ऐकल्या-वाचल्यानंतर, चित्र पाहिल्यानंतर थरकाप उडाला, मणिपुर आपल्या देशाचाच भाग आहे ना? का इतकी बिभत्सता, हिंस्त्रता वाढते आहे? अशा विकृत मानसिकतेचे पोषण कोण करते आहे? आपण माणूस म्हणून जगण्यास “ना लायक” आहोत हे अधोरेखित होत चालले आहे.

मणिपुरच्या विषयावर प्रधानसेवक, गृहमंत्री शांत का आहेत. पण कधी ना कधी त्यांना बोलावे लागेलच! संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे ,अजुनही गुन्हेगारांवर कारवाई झालेली नाही.  तर “लोकशाही वृत्तवाहिनी”ने सोमय्याची कथित अश्लील क्लिप ब्लर करून दाखवली! त्यासाठी चॅनलचे मालक नायडू, संपादक कमलेश सुतार यांचे अभिनंदन व आभार.  या जवळपास 40 क्लिप्स असून त्या  सर्व चॅनलला पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेल्याचे समजते आणि त्या नेमक्या अधिवेशनाच्या तोंडावरच कशा काय आल्या याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषद, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या व्हिडिओ क्लिप बाबतची माहिती दिली आणि कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेत केली त्याचबरोबर आमदार अनिल परब यांनीही जोरदार आवाज उठवला. आ दानवे यांनी किरीट सोमय्या यांचे वर हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, पद देण्याच्या लालसेपोटी सोमय्यानी महिलांचे शोषण केले आहे, अशा महिलांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत.  सोमय्या महाराष्ट्रद्रोही आहे,महाराष्ट्र बाहेरून आलेला हा उपरा आहे असाही  संताप त्यांनी व्यक्त केला. या कथित व्हिडिओमध्ये मराठी महिलाबद्दल सोमय्या अभद्र बोलत आहेत असे समजते आणि अशा प्रकारच्या क्लिपस नक्की कोणी केल्या याबाबत सर्वच संभ्रमात आहेत. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची घोषणा केली.

फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चॅनेलला पत्रही पाठवलं आहे. डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी या प्रकरणी वृत्तवाहिन्यांना आवाहन केले की चॅनल्सच्या माध्यमातून घरोघरी हे पाहिलं जात, चित्र ब्लर केलं तरी कृती लक्षात येते, चॅनल्सनी काही काळजी घ्यायला हवी. मात्र एक निश्चित आहे की, हा विषय मार्गी लागण्याचे आशास्थान नीलमताई असून महिलाप्रश्नावर त्यानी आजवर भरघोस काम केले आहे. पीडित महिलांवर त्या अन्याय होऊ देणार नाहीत हा विश्वास आहे.

तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषद सभागृहात म्हणाले की, “सभागृहात मांडण्यात आलेला हा विषय नक्कीच गंभीर आहे. राजकारणात अनेक वेळा असे प्रसंग येतात, ज्यात माणसाचं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लागते, केलेली पुण्याई पणाला लागते. आता जो काही प्रकार समोर आला आहे, त्यासंदर्भात विरोधकांकडे काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्यात. आम्ही या सगळ्याची चौकशी करु. फक्त गृहितकांच्या आधारे चौकशी करता येणार नाही. त्यामुळे विरोधकांनी किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात त्यांच्याकडे असलेले सबळ पुरावे आमच्याकडे द्यावेत. या सगळ्याची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. अशाप्रकारचे कुठलेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही. किरीट सोमय्या यांनी मला पाठवलेल्या पत्रातही तीच मागणी केली आहे. या सगळ्याची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परंतु, संबंधित प्रकरणात महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही. त्यामुळे पोलीस या महिलेची ओळख पटवतील आणि कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मोठा प्रश्न असा ज्या किरीट सोमय्यांनी आपल्या गॉडफादरच्या इशाऱ्यावर किंवा आशीर्वादाने महाराष्ट्रात जे थैमान घातले. केंद्रीय यंत्रणाचे हस्तक असल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेकांवर बेछूट आरोप केले. ईडी मधे केलेल्या तक्रारीचे पुढे काय होते याची सगळी माहिती पहिली सोमय्या यांना कळते ते कसं काय? असाही प्रश्न वारंवार सर्वांनाच पडत होता. किरीट सोमय्या हे  तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मंत्र्यांना आमदार खासदारांना लक्ष्य करून जेलमध्ये कोण जातील ते  नंबरवार सांगत होते.  जाम धुडगुस घालत होते. मधल्या काळात आ एकनाथ शिंदे आ देवेंद्र फडणवीसासोबत सत्तेत आल्यानंतर कीरिट सोमय्या थोडे शांत झाले आणि आता तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्यांच्यावर आरोप झाले होते, अशी मंडळी थेट सरकारमध्ये सामील झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांनी पंतप्रधानांना आवाहन केले की, “राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी पार्टी म्हणता तर जे कोणी भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर केंद्रीय व राज्य यंत्रणात लावून कारवाई करावी.

एकूणच सत्तासंघर्षाची लढाई गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या प्रकारे सुरू होती आणि समोर विरोधीपक्ष शिल्लक ठेवायचाच नाही अशा प्रकारे व्युह रचना राज्यातच नव्हे तर देशभरात रचली जात होती. त्याचे मास्टर माईंड केंद्रीय गृहमंत्री अमित भाई, जे कधीकाळी तडीपार होते. त्यांची काम करण्याची शैली आणि बदललेली पक्षाची कार्यशैली पाहता जुन्या अनुभवी आणि निष्ठावान नेत्यांना त्यांच्या सत्तेत जागा उरलेली दिसत नाही हे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आर्थिक घोटाळे परदाफाश करणारे सिरीयल एक्सपर्ट हे महाराष्ट्राच्या राजकारणातील “हातोडा सम्राट” अशी ज्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्यावरच या कथित अश्लील विडिओ प्रकरणामुळे मोठा हातोडा पडल्याचे बोलले जाते, तर दुसरीकडे हे प्रकरण नक्की कोणी समोर आणले आहे याबाबत चर्चाही होताना दिसते. आता पोलीस याच्या मुळाशी जातील का हा प्रश्न आहेच.

मुळात कोणतेही क्षेत्र असो तिथे महिलांना दुय्यम लेखणे, त्यांचे खच्चीकरण करणे आणि त्यांचे मानसिक आणि लैंगिक शोषण करणे असे प्रकार होताना दिसतात. ति च्या कर्तृत्वापेक्षा तिचे स्त्रीपण हे तिच्यासाठी अनेकदा नुकसानकारक ठरते की काय असा प्रश्नही पडतो. या क्षेत्रामध्ये कर्तृत्वशून्य महिलाही असतील, मात्र तसे असले तरीही कोणतीही लालूच देऊन अशा महिलांना राजकीय क्षेत्रात मोठे स्थान देणे हे घातकच नाही का आणि जर  या वायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप खऱ्या असतील आणि महिलांनी आपल्याला न्याय मागण्याची भूमिका कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून केली असेल तर त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजेच.

मुळात पहिली चौकशी व्हायला पाहिजे ती कीरिट सोमय्या यांची केन्द्र व राज्य  सत्तेतील पक्षाचे माजी खासदार आणि पदाधिकारी आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची सूट देणे हे योग्य होणार नाही. मुळात किरीट सोमय्या यांना कोणत्या कारणासाठी केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे हाही मोठा प्रश्न आहे. असे अभद्र ,अनैतिक ,लांछनास्पद विषय समोर आल्यावर अशा व्यक्तीची ही सुरक्षा काढून घेण्याची गरज आहे की नाही? समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. पीडित महिला असुरक्षित व भयभीत राहतील. प्रश्न असा आहे की, अशी घटना जर महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडली असती तर निश्चितच पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपाने सुसंस्कृत आणि संस्कारीपणाच्या गोष्टी सांगून हैदोस घातला असता की नाही.

मुळात पक्षाला सोमय्या नको आहेत का आणि म्हणून असे काही षडयंत्र आखले गेले का अशी चर्चाही सर्वत्र आहे आणि तसे असले तरी अशा प्रकारे कोणाच्या खाजगी आयुष्यातील प्रसंग चित्रित करून ते व्हायरल करणे म्हणजे त्याचे आयुष्य संपवण्यासारखं आहे.  किरीट सोमय्या मराठी माणसांबद्दल आकसाने बोलले,वागले आहेत आणि ईडीच्या आधाराने ते वारेमाप सुटले आणि कदाचित अशाच पाठिंब्यामुळे सोमय्याची मानसिकता अशा प्रकारच्या शोषणाकडे वळली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारामध्ये आपल्या सर्वसामान्य समाजातील तथाकथित सुशिक्षित आणि ज्यांनी बोलायला पाहिजे असे साहित्यिक, कलाकार ज्यांना स्वतःचा टीआरपी किंवा भूमिका आहे ,स्वतःला विचारवंत समजतात असे कोणीही बोलताना दिसत नाही.

“आम्हाला काय त्याचे” असे म्हणून गप्प राहणारी जमात जर समाजात असेल तर अशा व्यक्तींवर पुढच्या काळात कधी अन्याय झाला तर सर्वसामान्य जनता त्यांच्यासाठी निश्चितच बोलणार नाही हे नक्की. अपेक्षा कोणाकडून करावी हा प्रश्न या घटनेमुळे वारंवार येतो, राजकीय पक्षांच्या कार्यालयात विशाखा समिती असते की नाही इथपासून विषय सुरू होऊन ते स्वार्थासाठी काहीही करण्यास तयार असणारे स्त्री-पुरुष जर राजकारणात असतील तर नक्कीच राजकारणाचं चांगभलं नव्हे माती होण्यास पूर्ण वाव आहे हे नक्कीच हे असे लोक देशाचे लोकांचे काय भले करणार? तेव्हा राज्यभरातील स्त्रीशक्तीने या अशा प्रकारांना गांभीर्याने घेऊन त्या कोणत्याही पक्षाच्या असेनात पक्षभेद विसरून अशा प्रवृत्तींविरुद्ध बोलण्याची गरज निर्माण झाली आहे हे नक्कीच आणि हो जर या व्हिडिओत सोमय्या मराठी महिलांबाबत अभद्र बोललेअसतील तर ते “महाराष्ट्रद्रोही” आहेतच. कारण देश की हर एक बेटी देश का सम्मान होती है.