IIT मुंबई प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; प्राध्यापकांच्या अटकेची मागणी

महाराष्ट्र

मुंबई: IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्राध्यापकांवर तत्काळ कारवाई करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. साहिलवर जातीवाचक व मानसिक छळ तसेच बिनबुडाचे आरोप करण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केला.

गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उदय भानू चिब म्हणाले की, साहिलच्या आत्महत्येस प्रा. सत्यनारायण दुल्ला जबाबदार असल्याचा आरोप असून त्यांना तत्काळ अटक करावी. तसेच प्रा. केदारे यांचीही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा करत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित दोन्ही प्राध्यापकांना अटक केल्याशिवाय निष्पक्ष चौकशी होणार नाही, असे चिब यांनी सांगितले.

संस्थाच संस्थेतील घटनेची चौकशी करणार असेल तर ती चौकशी निष्पक्ष कशी होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत मागील सात महिन्यांत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी नमूद केले.

साहिलचा लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे क्राईम ब्रँचकडे असल्याचे सांगत त्यातील डेटा तातडीने साहिलच्या पालकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही युवक काँग्रेसने केली. साहिलला न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असे चिब यांनी स्पष्ट केले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी साहिलच्या पालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून सांत्वन केले. साहिलला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष लढा देईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याचे चिब यांनी सांगितले.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी साहिल हा अत्यंत हुशार विद्यार्थी असल्याचे सांगत त्याच्यावर कॉपी केल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा केला. संस्थेने कोणतीही चौकशी न करता आरोप केले आणि नंतर ते विधान मागे घेत माफी मागितल्याचे त्यांनी सांगितले.

IIT पवईमध्ये जातीवरून छळ होत असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असल्याचा दावा शबरीन यांनी केला. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना बोलण्यापासून रोखले जात असून करिअर खराब करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, उदय भानू चिब यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईचे सहपोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांची भेट घेतली. साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणातील संबंधित व्यक्तींवर तत्काळ कारवाई करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत