ishwar gaykar

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याची टोमॅटो विकून 2.8 कोटी रुपयांची कमाई!

महाराष्ट्र

शिरूरः पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने महिनाभरात टोमॅटोची विक्री करुन तब्बल 2.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ईश्वर गायकर (वय ३६, रा. पाचघर) असे शेतकऱ्याचे नाव आहे. 12 एकरावर सध्या टोमॅटोचं पीक असून सध्याच्या दरवाढीमुळे गायकर कुटुंबाचं टोमॅटोचं पिक म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरत आहे.

गायकर कुटुंब हे मुळचं पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या पाचघर गावचं आहे. टोमॅटो शेतीमधून त्यांनी यंदाच्या सिझनमध्ये आता 2 कोटी 80 लाख रुपये कमवले आहेत. विशेष म्हणून गायकर कुटुंबाकडे अजून 4000 कॅरेट टोमॅटो उपलब्ध असून सिझन संपेपर्यंत गायकर कुटुंब 3 कोटी 50 लाख रुपयांपर्यंत करेल, असे सांगितले.

ईश्वर गायकर म्हणाले, ‘आम्हाला एका दिवसात हे यश मिळालेल नाही. मागील 6 ते 7 वर्षांपासून आम्ही 12 एकरावर टोमॅटोचं पीक घेत आहोत. अनेकदा आम्हाला यामध्ये तोटाही सहन करावा लागला पण आम्ही आशा सोडली नव्हती. 2021 मध्ये आम्हाला 18 ते 20 लाखांचा तोटा झाला होता. मात्र आम्ही मागे हटलो नाही 11 जुलै रोजी 900 कॅरेटची विक्री केली. त्या दिवशी तब्बल 18 लाख रुपये मिळाले.’

‘आम्ही यावर्षी 12 एकरांवर टोमॅटोचं पीक घेतले आहे. आतापर्यंत आम्ही 17 हजार कॅरेटची विक्री केली आहे. या कॅरेटसाठी आम्हाला सरासरी 770 ते 2311 रुपये प्रती कॅरेटदरम्यान दर मिळाला आहे. आतापर्यंत आम्ही यामधून 2.8 कोटी रुपये कमवले आहेत. आमच्याकडे अजूनही 3 ते 4 हजार कॅरेट टोमॅटो आहेत. याचा हिशेब लावला तर या वर्षात आमची कमाई 3.5 कोटींपर्यंत जाईल. माझ्या पालकांचा, आजी-आजोबांचा आशिर्वाद आणि माझ्याबरोबर शेतात कष्ट करणाऱ्या माझ्या पत्नीमुळे हे यश मिळालं आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज समाधानी आहे,’ असेही ईश्वर यांनी सांगितले.

दरम्यान, शेती हा ईश्वर यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. पूर्वी गायकर कुटुंब केवळ 1 एकरावर टोमॅटोचं पीक घ्यायचे. त्यानंतर मदतीसाठी मजूर उपलब्ध झाल्याने त्यांनी 12 एकरांमध्ये टोमॅटोचे पीक घेण्यास सुरुवात केली. गायकर हे टोमॅटोबरोबरच कांद्याचेही पीक घेतात. तसेच ते सिझननुसार फुलांचेही पीक घेतात. पण, यंदा टोमॅटोमुळे चांगले दिवस पाहायला मिळत आहेत.