ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या कामावर आधारित या पुस्तकातुन प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल

महाराष्ट्र

पुणे: अनेकदा कायद्यांच्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विधिमंडळात काम करावे लागते. कित्येक तालुक्यात स्वयंसेवी संस्था नाहीत. तेंव्हा शासनाला काम करावे लागते. चांगल्या अधिकाऱ्यांमुळे कामाला गती येते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यामुळे येणार्‍या दबावाला झुगारून स्वयंसेवी संस्थांनी विधायक काम उभे केले ही पुण्यातील संस्थांच्या कामाची पावती आहे.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला बालहक्कांची सनद जाहीर व्हावी. ज्ञानदेवी स्वयंसेवी संस्थेच्या चाइल्ड लाईनच्या माध्यमातून झालेल्या कामावर आधारित ‘पालकांशी हितगुज’ आणि ‘मुलांच्या जगाचे वास्तव’ या पुस्तकांतून प्रेरणादायक प्रयत्नांची दिशा मिळेल. समाजाने देखील अशा कामात पुढे यावे, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केली.

मुलांच्या जगात गेली चाळीस वर्षे काम करताना आलेल्या अनुभवावर आधारित ज्ञानदेवी चाइल्ड लाइन संस्थेच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेल्या ‘पालकांशी हितगुज’ आणि ‘मुलांच्या जगाचे वास्तव’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पुण्यामध्ये सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बालमानस शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण शुक्ला, वंचित विकास या सामाजिक संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आणि कार्यकर्ते गायत्री पाठक उपस्थित होत्या. यावेळी संस्थेच्या माजी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार डॉ. गोर्‍हे यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, ‘डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेली ओघवत्या भाषेतील ही दोन्ही वाचनीय पुस्तके आहेत. पुस्तक आणि वाचक या दोन्हींच्या भेटीचा हा अपूर्व योग आहे. विपरीत परिस्थितीतही सकारात्मक काम करणाऱ्या अनेकांना ऊर्जा कशी मिळते. ते आपले काम सातत्याने करतात यातच त्यांच्या यशाचे गमक आहे. समाजाने त्यांना विश्वासाने दिलेला पुरस्कार हा फार मोठा असतो.

पुण्याच्या सुसंस्कृत भागात स्वयंसेवी संस्थांनी उभे केलेले काम अतिशय परिणामकारक आहे. अनेकांनी त्याला गौरवले आहे. आव्हानात्मक स्थितीमध्येही काम ज्ञानदेवी संस्थेने केले आहे. यामुळे अनेक गुन्हेगारांना शिक्षा देखील झाली आहे. अनेक कायद्यांमध्ये आजही काही मर्यादा आहेत. पण बदलत्या परिस्थितीनुसार समाजाची नजर मात्र प्रत्येक घडामोडींवर असते. न्याय व्यवस्थेतही अनेकदा न्यायाच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातात. यामुळे लोकशाहीवर विश्वास निर्माण करण्याचे काम मुलांच्या मनावर केले, याबद्दल चाइल्ड लाईनच्या कामाचे कौतुक त्यांनी केले. या कामात आवश्यक ती मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले.

महिलाविषयक कोणत्याही गुन्ह्यात पीडितांची नावे जाहीर न करण्याची सूचना विधिमंडळात डॉ. गोर्‍हे यांनी प्रथम केल्याची आठवण त्यांनी सांगितली. यामुळे महिला अत्याचाराच्या अनेक घटनांचा उल्लेख आणि आढावा विधीमंडळाकडे अधिक प्रमाणात होऊ लागल्याचे, त्या म्हणाल्या. यावेळी वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर आणि बालमानसशास्त्रज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनीही आपले विचार मांडले. डॉ. सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली.