आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचा मुंबईत पहिल्यांदाच रसास्वाद
मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी आणि ठसठशीत छाप उमटवणाऱ्या ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाचे मुंबईत पहिल्यांदाच विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात होणार आहे.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
१ तास १८ मिनिटांचा ‘पोटरा’ हा चित्रपट ग्रामीण वास्तवाचे अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी दर्शन घडवतो. ग्रामीण भागात आजही मुलींना समाजातील जुनाट रूढी-परंपरांमुळे कशा प्रकारच्या बंधनात्मक जीवनाला सामोरे जावे लागते, याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.या विशेष प्रदर्शनासाठी सभासदांसह प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.