महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारण सोडण्याचा निर्णय

महाराष्ट्र राजकीय

पंजाब: आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये धक्का बसला आहे. पंजाबमधील खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार अनमोल गगन मान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

पंजाब विधानसभा अध्यक्षांना अनमोल गगन मान यांनी राजीनामा पाठवला आहे. त्यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारल्यास पंजाबमध्ये आणखी एक पोटनिवडणूक होईल असे म्हटले जात आहे.

‘मी दु:खी मनाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सभापतींना मी माझा राजीनामा पाठवला आहे, त्यांनी तो स्वीकारावा अशी माझी विनंती आहे. आम आदमी पक्षासोबत माझ्या शुभेच्छा नेहमी असतील. पंजाब सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी मला आशा आहे’, असे अनमोल गगन मान यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

अनमोल गगन मान या प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहेत. २०२० मध्ये त्या आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाल्या होत्या. २०२२ च्या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांनी पक्षाने तिकीट दिले होते. मोहालीतील खरार विधानसभा मतदारसंघातून अनमोल गगन मान आमदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी आप पक्षाच्या त्या सर्वात तरुण आमदार ठरल्या होत्या. त्यांच्याकडे पर्यटन आणि संस्कृती विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.

अनमोल गगन मान यांचा जन्म १९९० मध्ये मानसा येथे झाला. चंडीगडमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. त्यानंतर अनमोल संगीत क्षेत्राकडे वळल्या. अनमोल गगन मान यांनी १६ जून २०२४ रोजी वकील शाहबाज सिंह सोही यांच्याशी लग्न केले. शाहबाज सिंह हे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत.