मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात स्थळे शोधून दोष दूर करणार; देवेंद्र फडणवीस 

राजकीय

मुंबई: मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

दरम्यान महामार्गांवरील वाहन अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी पोलिसांनी हद्दीचा प्रश्न निर्माण न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव व मदतकार्य करावे. महामार्गावरील वारंवार अपघात होणारी ठिकाणे शोधून तेथील दोष दूर करावेत. महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर एक लेन वाढवून सध्याच्या सहा लेनऐवजी हा मार्ग आठ लेनचा करण्यात यावा, अशा अनेक सूचना अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधीवरील चर्चेत सहभाग घेताना केल्या. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या सूचनांचा राज्य सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला उत्तर देताना दिले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात लक्षवेधीवरील चर्चेत सहभाग घेताना सांगितले की, मराठा समाजाचे नेते विनायक मेटे आपल्या सर्वांचे सहकारी होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आपल्या सर्वांसाठी धक्कादायक होती. अपघातानंतर त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली असती तर ते कदाचित वाचू शकले असते, असे अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांनीही दूरध्वनी करुन मेटे साहेबांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली आहे. मेटे साहेबांचा वाहनचालकही सातत्याने जबाब बदलत आहे. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातस्थळांचा शोध घेऊन तेथील त्रूटी सुधारण्याचे काम सुरु आहे. त्रुटी दूर केल्यानंतर महामार्गावरची कोंडी व अपघातांची शक्यता कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला. अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करुन त्यांना पोलिसांच्या प्रतिसाद व बचाव कार्यवाहीतील त्रूटी दूर करुन प्रशासकीय सुधारणा सुचविण्यास सांगण्यात येईल. मुंबई-पुणे महामार्ग आठपदरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिले.