धामारीत पुन्हा एका जखमी मोराला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान

शिरूर तालुका

शिक्रापूर: धामारी (ता. शिरुर) येथील एका शेतामध्ये मागील आठवड्यात आढळून आलेल्या जखमी मोराला नागरिक व पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने जीवदान देण्यात यश आलेले असताना पुन्हा एका मोराला नागरिकांच्या सतर्केतेने जीवदान देण्यात प्राणी मित्रांना यश आले आहे.

धामारी (ता. शिरुर) येथील दत्त नगर येथील एका शेतात एक मोर जखमी अवस्थेत असल्याचे धर्मेंद्र जठार यांना दिसून आले. त्यांनी पाबळ पोलीस चौकीचे पोलीस नाईक विशाल देशमुख यांना माहिती दिली. दरम्यान विशाल देशमुख यांनी तातडीने वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुका सचिव सर्पमित्र शेरखान शेख यांना माहिती दिली. त्यावेळी वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, सचिव शेरखान शेख, विनोद सासवडे यांनी त्याठिकाणी धाव घेत जखमी मोराला ताब्यात घेतले.

यावेळी धामारीचे सामाजिक कार्यकर्ते हरिदास डफळ, धर्मेंद्र जठार, विशाल गायकवाड, सागर फंड यांसह आदी उपस्थित होते. प्राणीमित्रांनी सदर जखमी मोराला शिताफीने ताब्यात घेत शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल प्रवीण क्षीरसागर यांना माहिती देत सदर मोरावर पशु शिकीत्सक डॉ, नितीन सोनवणे यांच्याकडून प्राथमिक उपचार केले. यावेळी सर्पमित्र अमोल कुसाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ काशीद यांसह आदी उपस्थित होते, तर या मोरावर उपचार करुन त्याला शिरुर वनविभागाच्या ताब्यात दिले आहे, तर पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने मोराला जीवदान मिळाल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.