केंदूरच्या सुक्रेवाडीत भरला चिमुकल्यांचा आठवडे बाजार

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकताच आठवडे बाजार भरवला होता. त्यामुळे शाळेचा परिसर बाजाराने दुमदुमून गेल्याने शालेय विद्यार्थांनी बाजार अनुभवला आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उत्पादन क्षम शिक्षण व व्यवसायाचे अनुभव मिळण्यासाठी नुकतेच आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष मनेश थिटे, मुख्याध्यापिका सुरेखा पडवळ, धर्मेंद्र चौधरी, माजी उपसरपंच जयश्री सुक्रे, संदीप सुक्रे, अश्विनी सुक्रे यांसह आदींच्या हस्ते चिमुकल्यांच्या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान शालेय मुलांनी भाजीपाला, खाद्यपदार्थांसह आदी साहित्य बाजार विक्री साठी मांडले होते, तर पालकांसह ग्रामस्थांनी सदर बाजारात खरेदीसाठी हजेरी लावली होती, तर चिमुकल्यांच्या बाजारातील आवाजाने शाळेचा परिसर दणाणून गेला होता, तर यावेळी बोलताना शालेय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, नफा तोटा याचे ज्ञान मिळावे या हेतूने सदर बाजाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पडवळ यांनी सांगितले, तर शालेय समितीचे अध्यक्ष मनेश थिटे यांनी सर्वांचे आभार मानले.