कौतुकास्पद; अनावश्यक खर्च टाळून निराधार मुलांसोबत केला वाढदिवस साजरा

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) येथील माजी सैनिक राजू बबन मेहेत्रे यांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त केक, फुगे, नवीन कपडे, फटाके इत्यादी मौज-मजेला फाटा देत अनाठायी होणारा खर्च टाळून सामाजिक सेवेचे भान जपत पद्मश्री स्वर्गीय डॉ सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापक असलेल्या “द मदर ग्लोबल फाउंडेशन पुणे” संचलित शिरुर येथील “श्री मनशांती छात्रालय” येथे अत्यंत साध्या पद्धतीने मुलांचा वाढदिवस साजरा करुन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

 

राजू मेहेत्रे हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यकर सहायकपदी नुकतेच पुणे येथे रुजू झाले आहेत. मेहेत्रे देशसेवेनंतर आपल्या हातून समाजसेवा घडावी यासाठी नेहमीच वेगवेगळे समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात. आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देणगी म्हणुन शिरुर येथील मनःशांती छात्रालयाला अत्यंत उपयोगी पडेल असा भाजीपाला भेट म्हणुन दिला. तसेच सगळ्या मुलांसोबत केक कापून खाऊचे वाटप केले.

 

यावेळी राजू मेहेत्रे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी जयश्री, मुलगी समीक्षा व मुलगा शार्दुल यांनी छात्रालयातील मुलांसोबत मनमुराद गप्पा मारुत त्यांच्या स्वप्नांना बळ दिले. तसेच छात्रालयातील सर्व मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कायम आधार देत सदैव हातभार लावण्याचे ठरवले.

 

यावेळी ‘द मदर ग्लोबल फाउंडेशन’ चे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ म्हणाले की गेल्या 47 वर्षापासून पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई व माईच्या सर्व संस्था अनाथ, निराधार, विधवांचे संगोपन करत असून त्यांच्या कुठल्याही संस्थेस शासकीय अनुदान नाही. आपल्या सारख्या दात्यांच्या मदतीवर आजवर आमच्या संस्था संगोपनाचे, शिक्षणाचे व त्यांचे पुनर्रचनाचे कार्य करत आहेत. त्याबद्दल मेहेत्रे केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानत ही मदत आमच्यासाठी लाखमोलाची आहे असे म्हणत धन्यवाद मानले.