साहेब शासकीय वाहनांवरील दंड भरणार तरी केव्हा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

आपला तो बाब्या लोकांच ते कार्ट अशी आरटीओची वागणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्ह्यात सर्वत्र पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते असून अनेक वाहन चालकांवर खटले दाखल होत असताना कारवाई मध्ये दुजाभाव करत आपला तो बाब्या लोकांच ते कार्ट अशीच कारवाई पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत असून त्यांच्याच वाहनांवरील दंड भरला नसल्याचे उघड झाले असल्याने साहेब शासकीय वाहनांवरील दंड भरणार तरी केव्हा असे म्हणण्याची वेळ आली आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वत्र पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, कर न भरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात असून वेळेत दंड न भरणाऱ्या लोकांवर न्यायालयात खटले दाखल केले जात असून त्यासंदर्भात लोक अदालतीचे आयोजन केले जात आहे. सध्या अनेकांना त्यासंदर्भातील नोटीस बजावण्यात जात आहेत. मात्र पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही वाहनांची परिस्थिती उलट असून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या काही वाहनांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आकारण्यात आलेला दंड अनेक दिवसापासून तसाच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहनांची परिस्थिती लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशी झाली आहे.

सदर कार्यालयाचे अधिकारी वापरत असलेल्या एम एच ०४ के आर ६४७२ या वाहनाने पुणे मुंबई एक्सप्रेस महामार्गावर १ जुलै २०२२ रोजी वेग मर्यादा ओलांडल्या प्रकरणी तर दुसरे वाहन एम एच ०४ के आर ६४१२ या या वाहनाने देखील नवले ब्रिज परिसरात ३० जुलै २०२२ रोजी वेग मर्यादा ओलाडल्या प्रकरणी 2 हजार रुपये दंड आकारण्यात आलेला असून अद्याप पर्यंत सदर दंड भरण्यात आलेला नाही. त्यामुळे या कार्यालयाच्या दोन्ही वाहनांवर दंड करुन 8 ते 9 महिने उलटून देखील पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालया कडून वाहनांवरील दंड भरण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून सर्व सामान्य नागरिकांना एक न्याय आणि स्वतःला वेगळा न्याय अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वाहनांवरील या स्थितीबाबत पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आपण ऑफिसला या प्रतिक्रिया देतो असे म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले आहे.