नुतनीकरण केलेल्या शिक्रापूर न्हावरे रस्त्याच्या कडा तुटल्याने, चक्क रस्ताच खचतोय…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर न्हावरे रस्त्यावर सखल भागात पावसाचे पाणी नियमितपणे साचून राहत असल्याने व रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्याच्या कडा तुटून गेल्या असून ठिकठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या वाहून गेल्याने रस्त्याच्या कडेला खड्डे पडल्याने नवीन रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे – न्हावरे या सुमारे ३० किलोमीटर रस्त्याचे काही दिवसांपूर्वी नूतनीकरण नुकतेच करण्यात आले असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक जलद झाली आहे.

परंतु सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ठिकठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी साचत असल्याने अनेक ठिकाणी रस्ता खचत आहे. तसेच जोरदार आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडा देखील तुटलेल्या आहेत तर काही ठिकाणी भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या नवीन रस्त्याची दुरावस्था होत असल्याने संबंधित ठेकेदाराने पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही अशा पद्धतीने योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.

तसेच संबंधित ठेकेदाराने प्राथमिक स्वरूपात रस्त्याची पाहणी करुन तातडीने डागडुजी करणे व साईड पट्ट्या भरणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. या प्राथमिक बाबीकडे प्रशासनाने व संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यास चांगल्या रस्त्याची वाट लागण्यास फार दिवस लागणार नाहीत अशा भावना येथील काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.