पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब फराटे यांचा ‘वारी सुवर्ण सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा

शिरूर तालुका

वयाच्या बाराव्या वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारे बाळासाहेब फराटे यांनी केली पन्नास वेळा पायी वारी 

शिरूर (तेजस फडके): मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील अखंड पन्नास वर्षे पंढरीची पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब आत्माराम फराटे (नाना) यांची आंळदी ते पंढरपूर सलग पन्नास वर्ष परिपूर्ण वारीचे औचित्य साधुन ” वारी सुवर्ण सोहळा ” मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. वयाच्या बाराव्या वर्षापासून आळंदी ते पंढरपूर अशी अखंड पन्नास वर्षे पायी वरी करत अनोखी विठ्ठल भक्ती जगणाऱ्या ह.भ.प. बाळासाहेब फराटे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

 

यावेळी बाळासाहेब फराटे यांनी संपूर्ण आयुष्यभर नामस्मरण व हरि चिंतन करत जीवन सत्मार्गी लावले आहे. आपल्या जीवनात विठ्ठलाशी जोडलेले तनामानाचे नाते अखंडपणे जपले असून सात्विक जीवन कसे असावे व वारकरी संप्रदायाचा एकनिष्ठ पायिक कसा असावा तर बाळासाहेब फराटे यांच्यासारखा सात्विक असावा अंखंड मुखी नामस्मरण असणारे वारकरी आहे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

 

आषाढी वारी म्हणजे जीवनाचा मूलमंत्र बनला आहे आषाढात वेध लागतात ते विठुरायाच्या पायी दिंडीचे आणि अभूतपूर्व आनंद सोहळ्याचे दिंडीसमवेत चालणे म्हणजे अभंग गात, नाचत, गर्जत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद, जीवन धन्य करणारा अनुभव असल्याची भावना ह.भ.प. बाळासाहेब फराटे यांनी भावना व्यक्त केली.

ह.भ.प.बाळासाहेब आत्माराम फराटे (नाना) मांडवगण फराटा यांची आंळदी ते पंढरपूर सलग ५० वर्ष परिपूर्ण वारीचे औचित्य साधुन सत्कार सोहळा ,किर्तन सेवा, तसेच अन्नदानाचा उपक्रम संपन्न झाला. यावेळी भगवताचार्य ह.भ. प.दिलीप महाराज भुसारी यांचे कीर्तन संपन्न झाले.ह.भ. प. बाळासाहेब फराटे यांना तुळशीहार घालून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक मान्यवर मंडळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व स्तरातून या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे कौतुक होत आहे. या सोहळ्याचे आयोजन राहुल बाळासाहेब फराटे यांनी केले होते.