समाजात एक चांगला माणूस आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून जगा; PSI अभिजित पवार यांचा कानमंत्र 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): आपले आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात याची जाणीव आपल्या सर्वांनाच असली पाहिजे. आई-वडील कधीच मुलांना चुकीचे सांगत नाही. कायम त्यांच्या हिताचाच विचार करतात. तुमच्या मनात कोणतीही गोष्ट असो त्यांना सांगत जा. तसेच कायमच चुकीचा निर्णय घेताना आपले आई-वडिल आपल्यासाठी काय करतात ते आठवा. समाजात एक चांगला माणूस आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून जगा असे प्रतिपादन शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी केले.

शिरुर पोलीस स्टेशन आणि महिला दक्षता समिती यांच्या वतीने शिरुर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे बुधवार (दि 26) रोजी “किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन” हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अभिजित पवार यांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना किशोरवयात घडणारे बदल, मोबाईलचा अतिरेक आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत त्यांनी मुलींना माहिती दिली. तसेच या वयात तुम्ही चांगला अभ्यास केला तर खूप मोठे अधिकारी व्हाल. या आभासी जगात फसु नका, तुम्हाला कोणीही त्रास दिला तरी पोलीस यांना एक मित्र व भाऊ म्हणून तुमच्या समस्या सांगत जा आणि कुठेही काही अडचण आली तर 112 या टोल फ्री नंबर वर कॉल करा,आम्ही लगेच त्या ठिकाणी हजर होऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला दक्षता समिती अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे, महिला दक्षता समितीच्या जिल्हा समन्वयक शोभना पाचंगे, नगरसेविका मनीषा कालेवार, महीला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा शशिकला काळे, सदस्या सुवर्णा सोनवणे, ललिता पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देशपांडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद…

पिंपरी दुमालाचे ग्रामपंचायत सदस्य शरद खळदकर याचं सदस्यत्व कायम