waghale-school-get-together

कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!

शिरूर तालुका

शिक्रापूरः शाळेतील दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शाळा सुटली तरी शाळेच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी जपल्या जातात. पुढे प्रत्येकाची वाट वेगवेगळी होते. पण, शाळेतील मित्र-मैत्रीणी म्हटले की प्रत्येकाला भेटायला आणि जुन्या आठवणीत रमायला आनंद वाटतो. वाघाळे येथील कालिकामात विद्यालयातील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींमध्ये रमून गेले होते.

कालिकामाता माध्यमिक विद्यालय वाघाळे येथील १९९१-९२च्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे शुक्रवारी (ता. ९) शिक्रापूर येथील एका हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. हॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला फेटा बांधण्यात येत होता. शिवाय, गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत होते. माजी विद्यार्थी एकमेकांना भेटून प्रचंड आनंदले होते. त्यावेळेचे ते शाळेचे मंतरलेले दिवस आठवून पुन:प्रत्ययाचा आनंद प्रत्येक जण घेत होता.

विद्यार्थी अनेक वर्षांनी एकत्र आल्यानंतर कुठे असतेस, असतोस. काय करतो, तुझं कसं चाललयं… मुलं काय करतात… अशी ख्याली खुशाली विचारण्यापासून अगं कुठं असतेस… कित्ती वर्षांनी भेटतोय… कसे आहेत सगळे… अशा अपुलकीच्या प्रश्र्नांपर्यंतचे संवाद आणि शालेय जीवनातील मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यापासून शिक्षकांच्या आशिर्वाद घेण्यात विद्यार्थी रमले होते. अनेक वर्षांनी झालेल्या गाठीभेटीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जुन्या आठवणींच्या चर्चा, गप्पा, खोड्या, किस्से व हास्य कल्लोळाने हा मेळावा उत्तरोत्तर रंगला होता. शिक्षक, मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने एक वेगळा आनंद सारेच जण अनुभवत होते. अनेक जन ऋणानुबंध जपत भूतकाळात रमले होते. आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी ताज्या केल्या. शिवाय, प्रत्येकाने आपली नव्याने ओळख करून दिली. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच सध्या आपल्या आयुष्यात काय चालले आहे, हे व्यासपिठावरून सांगितले.

शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पण, हे अनेकांना माहित नव्हते. कोणत्याही कामासाठी एकत्र येऊन मदत करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी केला. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांना पुस्तक भेट देऊन त्यांचे मनोमन आभार मानले. शिक्षकांनीही मार्गदर्शन करताना पुढील वाटचालीसोबतच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. स्नेहभोजनानंतर परत नक्की भेटू म्हणून आनंदाने निरोप घेतला.

दरम्यान, १९९१-९२च्या बॅचमधील विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी सुखदेव भोसले, दिलीप थोरात, संदीप धायबर, आशा गोरडे यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप थोरात यांनी केले.

उपस्थित शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणेः
१) मारुती थोरात (गुरुजी)
२) गुंडीबा गावडे (गुरुजी)
३) परशुराम शेळके (गुरुजी)
४) भास्कर वाबळे (सर)
५) बाळासाहेब शेळके (सर)

उपस्थित विद्यार्थिनींची नावे पुढीलप्रमाणेः
१) आशा काटे (गोरडे)
२) सविता उंद्रे (जगताप)
३) सविता गायकवाड (कारकूड)
४) वंदना वाबळे (काळे)
५) सविता कार्ले (झेंडे)

उपस्थित विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणेः
१) संदीप धायबर
२) संतोष धायबर
३) दिलीप थोरात
४) सुखदेव भोसले
५) अशोक शेळके
६) अशोक कारकूड
७) मोतीराम दंडवते
८) राजेंद्र थोरात
९) नवनाथ मापारी
१०) विष्णू फंड
११) गोरक्ष थोरात
१२) गोरक्ष कारकूड
१३) संदीप झेंडे
१४) नामदेव भोसले
१५) निळकंठ कारकूड