शिक्रापूर बाजार मैदानाची ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अखेर स्वच्छता 

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसताना ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा चक्क बाजार मैदानात टाकल्याने बाजार रस्त्यावर भरवण्याची वेळ आलेली असताना याबाबत अनेकांनी तक्रारी करत काही वृत्त देखील प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार मैदानाची अखेर स्वच्छता केली आहे.

शिक्रापूरचा कचरा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कचरा टाकण्यासाठी कोठे जागा उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतने येथील आठवडे बाजारासाठी स्वतंत्र असलेल्या बाजार मैदानात कचरा टाकण्यास सुरवात केल्याने संपूर्ण बाजार मैदान कचऱ्याने व्यापले गेले. परिणामी बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांना रस्त्यावर बाजार भरवण्याची वेळ आली होती. मात्र विक्रेते रस्त्यावर बाजार भरवत असताना देखील ग्रामपंचायत कडून कर आकारला जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करत बाजार मैदान खुले करण्याची मागणी केली होती.

याबाबत काही वृत्त देखील प्रसिद्ध झाले असता प्रशासानाने बाजार मैदानातील सर्व कचरा हटवत बाजार मैदानाची स्वच्छता केली असून आता आठवडे बाजार कोठे भरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.