कान्हूर मेसाईत नवनिर्वाचित पोलिसांच्या हस्ते ध्वजारोहण

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1 मे या महाराष्ट्र दिनी होणारे ध्वजारोहणचा मान हा नुकतेच पोलीस भरतीत यशस्वी होऊन कान्हूर मेसाईचे नाव उज्वल करणाऱ्या अशोक मिडगुले, अमोल मिडगुले, संकेत ढगे, विशाल धुमाळ व गौरव तागड या नवनिर्वाचित पोलिसांच्या हस्ते ध्वजपूजन करत ध्वजारोहण करण्यात आले आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस दलात यशस्वी झालेल्या सर्व भावी पोलीस अमलदारांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करत भगवे फेटे बांधून तसेच सर्वांना श्री विठ्ठलाची मूर्ती, शाल व गुलाबपुष्प देऊन सर्वांना प्राचार्य अनिल शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव सुदाम तलोळे, संचालक शहाजी दळवी, लहुजी तळोले, धनंजय तळोले, रामदास कुलट यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना ग्रामीण भागातील मुलांनी पोलीस भरती झालेल्या सर्वांचा आदर्श घ्यावा, तरुण वयात नको त्या गोष्टी करून आपले जीवन बरबाद करण्यापेक्षा या मुलांचा आदर्श शाळकरी विद्यार्थ्यांनी समोर ठेवावा, असे सांगत पोलीस दलात भरती झालेल्या अशोक मिडगुले, अमोल मिडगुले, विशाल धुमाळ, संकेत ढगे व गौरव तागड यांचे यश सर्वांना प्रेरक व पथदर्शी असल्याचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले तर पर्यवेक्षक किसन पांढरे यांनी सर्वांचे आभार मानले.