शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. अशाच एका घटनेत सविंदणे येथे दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला करून त्याला ठार केले. मात्र, नुकसान भरपाईसाठी आवश्यक पंचनाम्यासाठी संबंधित शेतकऱ्याला थेट सविंदण्यावरून शिरूरला येण्याच्या सूचना वनविभागातील कर्मचाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रंचड तीव्र नाराजी पसरली आहे.
पीडित शेतकऱ्यांनी सांगितले की, बिबट्याच्या हल्ल्यांमुळे आधीच मोठे नुकसान होते, त्यातच पंचनाम्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यायचे असल्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. वन विभागाने याबाबत अधिक जबाबदारीने वागून पंचनामा संबंधित शेतकऱ्याच्या गावातच येवून करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत वन विभागाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जेव्हा घटना गावात घडते, तेव्हा पंचनामा गावातच का केला जात नाही?” असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
वन विभागाने या समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांना गैरसोयी टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. यापूर्वी फोनवरून बिबट्याच्या हल्ल्यात पशूधन मृत्युमुखी झाल्याची
घटना वनविभागात कळवल्यास तातडीने त्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी येऊन पंचनामा करत होते .परंतु आता या नवीन जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे . या भागात बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातला असून या भागातील लहान मुले, मनुष्यावर जीव घेणे हल्ले केले आहे व शेकडो पाळीव प्राण्यांवर हल्ले करून ठार केले आहे. आता या नवीन जाचकाटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे
शिरूर तालुका हा महाकाय तालुका आहे शिरूर पासून काठापुर बु॥जवळपास ४० किलोमीटर अंतर आहे. तसेच तसेच तांदळी जवळपास ४० किलोमीटर आहे. तर कोरेगाव भीमा जवळपास ३५ किलोमीटर आहे .त्यातच वनविभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बिबटयाचा पशुधन, मनुष्यावर हल्ला झाल्यास कर्मचारी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचत नाही .आता या जाचक अटीमुळे मेंढपाळ, शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वनविभागा विरोधात संतापाची लाट उभी राहिली आहे.
“बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन मृत्यूमुखी पडल्यास शेतकऱ्यांनी केवळ फोनवर माहिती न देता लेखी स्वरूपात कार्यालयात अर्ज सादर करावा. प्रत्यक्ष अर्ज सादर करणे शक्य नसल्यास ईमेल, व्हाट्सऍप वर पाठवावा. तदनंतरच कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा करतील.”
निळकंठ गव्हाणे
वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर