‘गुबूवाला’ लघु चित्रपटास फर्स्ट फिल्म मेकर अवार्ड 2023 आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद व कवठे येमाई (ता. शिरूर) येथील कलावंतानी बनवलेल्या गुबुबाला या लघू चित्रपटास आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बुधवार (दि. ३१) रोजी भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च सेंटर मध्ये झालेल्या रोशनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये “गुबूवाला” या लघु चित्रपटास फर्स्ट फिल्म मेकर अवार्ड २०२३ अनेक ज्येष्ठ अभिनेते व प्रसिद्ध निर्माते/दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत अॕवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. देश विदेशातील १३०० लघुपटातून या लघुपटची निवड करण्यात आली. हा पुरस्कार फिल्म एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन औरंगाबाद/ संभाजीनगर या संस्थेकडून देण्यात आला.

दत्तात्रय जगताप यांनी भटक्या व वंचित समाजातील शिक्षणापासून दूर राहिलेल्या घटकांच्या संघर्षमय कथेवर आधारित ” गुबूवाला” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या लघु चित्रपटात मुख्य भूमिका दत्तात्रय जगताप यांनीच साकारली आहे. सिनेलेखक मोहन एकनाथ पडवळ यांनी या कथेचे उत्कृष्ट लेखन केले आहे. सह दिग्दर्शक सचिन शिंदे कवठेकर, कॅमेरामन संदीप शेटे, बालकलाकार भावेश सांगळे व कलाकार कांचन टेके, अनिल माशेरे, सोमनाथ बढे या सर्वांनी या लघु पटात उत्कृष्ट अभिनय केला आहे.

अतिशय कमी वेळेत मोठा संदेश देण्याचे काम लघुपट करत असतात. ग्रामीण भागातील अनेक हौशी कलाकार कमी खर्चात युटुब वर शॉर्ट फिल्म, मालिका टाकून आपले नशीब अजमावत आहेत. तसेच या माध्यमातून नाव लौकिक मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. अशा पुरस्काराने त्यांचे नाव देश विदेशात जाऊन त्यांच्या कलेची दखल घेतली जाते. त्यामुळे इतरांनाही यातून प्रेरणा भेटतात. गुबूवाला लघुपटातील एक शॉर्ट व्हिडिओ 32 लाख लोकांनी पाहिला व 1.6 लाख लोकांनी लाईक केला हे शिरूरच्या ग्रामीण भागातील कलाकारांचे यश आहे. असे मत सह दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी व्यक्त केले.

शिरूर सारख्या ग्रामीण भागातील कलाकारांनी लघु चित्रपटाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये मिळवलेल्या यशामुळे या सर्व कलाकारांवर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे, अशा आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ग्रामीण भागातील कलाकारांना नव निर्मिती करायला अजून ऊर्जा मिळते, अशी प्रतिक्रिया या लघुपटाचे लेखक मोहन पडवळ व दिग्दर्शक निर्माते दत्तात्रय जगताप यांनी बोलताना दिली आहे.