शिरुर तालुक्यात नगरसेविका महिलेच्या पतीला मारहाण

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) नजीक कासारी फाटा येथे जमिनीच्या मोजणीच्या वादातून नगरसेविका महिलेच्या पती सह त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मनोज दंडवते, अजय झेंडे, राकेश शेलार, प्रशांत शिंदे, बाजी हिंगमिरी यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) नजीक कासारी फाटा परिसरात गणेश पवार यांनी बाजीराव दंडवते यांच्याकडून काही जमीन विकत घेतलेली होती त्या जमिनीची मोजणी होऊन महसूल विभागाच्या वतीने हद्द कायम करुन देण्यात येणार असल्याने गणेश पवार व महेश गलांडे दोघे सदर ठिकाणी आलेले असताना महसूल विभागाचे अधिकारी हद्द कायम करत असताना शेजारी जमिन असलेले विलास दंडवते तेथे येत आम्हाला मोजणी मान्य नसल्याचे सांगू लागले.

दरम्यान महसूलचे अधिकारी त्यांचा जबाब घेत असताना काही युवक सदर ठिकाणी आले त्यांनी गणेश पवार व महेश गलांडे या दोघांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्य्यांनी तसेच लोखंडी गज व काठीने मारहाण करत जखमी केले. तसेच पुन्हा आम्हाच्या जमिनीत आला तर मारून टाकील, अशी धमकी दिली. सदर घटनेत नगरसेविका महिलेचे पती महेश बाळासाहेब गलांडे व गणेश सुरेश पवार दोघे जखमी झाले असून महेश गलांडे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली.

याबाबत महेश बाळासाहेब गलांडे (वय ३६) रा. वडगाव शेरी ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मनोज दंडवते, अजय झेंडे, राकेश शेलार, प्रशांत शिंदे, बाजी हिंगमिरी सर्व रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.